परीक्षण- रंगमुद्रा

खादं माणूस वाचल्यासारखं वाटतं,
एखादं पुस्तक वाचून संपवलं की.

कवी सौमित्रची 'पुस्तकं आणि माणसं' नावाची ही कविता. एकेका पुस्तकाला माणसाचा दर्जा दिलेला. याला अपवाद आहे, तो माधव वझे यांच्या 'रंगमुद्रा'चा. कारण हे एक पुस्तक तब्बल १४ माणसं वाचल्याचा अनुभव देतं. आपापल्या क्षेत्रात स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलेली ही माणसं. यांच्यातला समान धागा असा, की यांचं जीवन नाटकानंच समृद्ध बनवलेलं आणि पुढे नाट्यसृष्टीला या कलावंतांनी अधिक परिपक्व बनवलं. माधव वझे यांनी १९९० पासून या नाट्यवेड्या दिग्गजांच्या मुलाखतींना सुरूवात केली.

इथे सुहास जोशी, सुलभा देशपांडे, विजया मेहता, नीना कुलक
र्णी , डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, नसिरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, बी. व्ही. कारंथ, रतन थियम, भास्कर चंदावरकर, सतीश आळेकर, वीणापाणी चावला आणि सत्यदेव दुबे अशी चौदा माणसं भेटतात. 'रंगमुदा' वाचताना या दिग्गजांच्या खूप जवळ गेल्याचा अनुभव मिळतो.

या मुलाखती पूवीर् दिवाळी अंकात छापून आल्या आहेत. पण पुस्तकामुळे ही माणसं एकत्र भेटतात, आणि संग्रही राहतात. सर्वांत महत्त्वाचं असं, की केवळ तेच भेटत नाहीत तर ही माणसे आपल्याला त्यांच्या आवडत्या आणि आदर्शांचीही भेट घडवतात. इब्राहीम अल्काझी, लॉरेन्स ऑलिव्हिए, चेकॉव्ह, पोलिश तत्त्ववेत्ता ग्रेटोस्की, स्तानिस्लावस्की, ब्रेख्त, शेक्सपीअर, अॅरिस्टॉटल, गिलवूड यांच्यापासून कालिदास, भवभूती, बादल सरकार, विजय तेंडुलकर, भालबा केळकर, महेश एलकुंचवार यांच्यापर्यंत अनेक कलावंत, त्यांची विचारसरणी आपल्याला थोडीतरी समजते. कारण या १४ कलावंतांच्या अनुभवातून ही माणसं सतत फिरत असतात. सोबत अभिनय, संहिता, दिग्दर्शन, प्रेक्षक, त्याचं आकलन, आजचे नट आदींवर मुद्देवार विश्लेषण आहेच. शेकडो नाटकांचे संदर्भ सापडत जातात. 'मिस ज्युली', 'गद्दार', 'काचेचा चंद', 'हॅम्लेट', 'ऑथेल्लो', 'नटसम्राट', 'घाशीराम कोतवाल', 'लायर डायर', 'अंधा युग', 'फायर अॅण्ड द रेन', 'हयवदन', 'महानिर्वाण', 'उत्तररामचरित' अशी शेकडो. या नाटकांबरोबर त्यातला कलाकार, त्यावेळची स्थिती, त्यातल्या गमतीजमती, चुकलेले आडाखे हे सगळं वाचता येतं. तेव्हा लक्षात येतं की, नाटकाला 'प्रयोग' किंवा 'खेळ' का म्हणतात ते. या पुस्तकातून मिळणाऱ्या आनंदाचं श्रेय या कलाकारांना आणि तितकंच मुलाखतींमधील मामिर्क प्रश्नाना  आहे.

एक मुलाखत वाचून, जो परिणाम साधत नाही ते हे पुस्तक साधतं. उदाहरणच द्यायचं तर, सुहास जोशी, सुलभा देशपांडे यांच्या मुलाखती वाचताना, 'एनएसडी', अल्काझी, दुबे, विजयाबाई त्यांची पद्धत, त्याबाबतचे वाद, 'रंगायन', 'आविष्कार' हे मुद्दे येतात. पण, यानंतर लगेच विजयाबाईंची मुलाखत वाचताना त्यांची भूमिका, त्यावेळचे निर्णय, त्यांची पार्श्वभूमी कळते. विजयाबाईंच्या बोलण्यातले अनेक संदर्भ दुबे, लागू किंवा चंदावरकरांच्या मुलाखतीत सापडतात. पुन्हा तपासून घेता येतात.

प्रत्येकाची कामाची पद्धत, रंगमंचावर एनजीर् वापरण्याची पद्धत, नाटक निवडतानाची प्रोसेस समजून घेता येते. लागूंची एनजीर् टिकवण्याची, भूमिका साकारण्याची पद्धत वाचताना चकित व्हायला होतं. भूमिकेच्या इतकं दूर राहून ती साकारणं, हे अजब आहे! सगळ्यात आश्चर्य नसरुद्दीनचं. लहानपणच्या चिडचिड्या, एकटं एकटं राहणाऱ्या, 'ढ' मुलाला शाळेत नाटकात काय घेतात आणि अभिनयात तर तो बाजी मारतोच, पण अभ्यासात पहिल्या पाचात येतो. अभिनयाला अंगभूत मानताना, करिअर म्हणून त्यांनी ठरवलेले ठोकताळे वाचणं हा नवी दृष्टी देणारा अनुभव आहे.

यात वेगळी आहे ती भास्कर चंदावरकर यांची मुलाखत. कारण, ते संगीतातले. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, सांगीतिक शिक्षण हे वाचताना ते संगीतकार असतात. पण, पुढे पुढे त्याचा नाटकाशी जोडला गेलेला संबंध दिसतो. तो इतका घट्ट की, त्यांचं संगीत हे नाटकातलं एक पात्र बनतं.

गिरीश कर्नाड तर फार बुद्धिवान. वयाच्या २२ व्या वषीर् हा माणूस नाट्यसृष्टीची उणीव हेरून 'ययाति' लिहितो! दिवाणखान्यात अडकलेल्या नाटकांवर टिपणी करून ते थांबत नाहीत, तर त्यावर उपाय शोधायला थेट संस्कृत रंगभूमीपर्यंत जातात. त्यांनी केलेली नाटकं, नाटकाच्या वेळी प्रेक्षकांच्या प्रतिसादाशी संबंधित तत्त्वं हे आजच्या कलाकार, दिग्दर्शकासाठी खूप महत्त्वाचं आहे. हीच गोष्ट कारंथांची. घरच्या गरिबीमुळे पळून गेलेला, चोऱ्या करणारा मुलगा फिरत फिरत एनएसडीत येतो आणि परततो तो प्रयोगशील दिग्दर्शक बनून. प्रत्येकाचं हे आयुष्य रोमांचक आहे. शिवाय 'एनएसडी'चे संदर्भ आल्यामुळे अल्काझी, शंभू मित्रा सतत भेटतात. सत्यदेव दुबे यांची मुलाखत तर भन्नाट आहे. या माणसाला 'मोस्ट लव्ह्ड अॅण्ड मोस्ट हेटेड मॅन ऑफ थिएटर' का म्हणतात ते यातून समजतं. त्यांची मुलाखत वाचताना आपण 'प्रश्नोत्तरांच्या फैरीं'मध्ये सापडतो!

'रंगमुदा' नाट्यरसिकांच्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठवेल. लागूंच्या 'लमाण'नंतर नाव घ्यावं इतकं हे पुस्तक महत्त्वाचं. देशातील भौगोलिक भिन्नतेचाही परिणाम या लोकांच्या नाट्यकृतीवर दिसतो. पण आपण समाजाचं देणं लागतो हे लक्षात घेऊन प्रेक्षकांना सतत प्रॉडक्टिव देणं हा ध्यास यातल्या प्रत्येकाला आहे. त्यातून नाटकांच्या संहिता, सादरीकरणातले 'प्रयोग' समोर येतात. सर्व मुलाखती रेकॉर्ड करून जशा आहेत तशा मांडल्यात. त्यातही मुलाखत होण्यापूवीर् लेखकाने कशी फोनाफोनी केली, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, मुलाखत कुठे, कशी झाली हे ही चार ओळीत लिहिलंय. त्यातूनही या कलावंतांचं व्यक्तिमत्त्व उभं राहतं. ज्या माणसांना आपण केवळ अभिनय, दिग्दर्शनातून पाहतो, त्यांच्या चिंतन, अनुभवातून साकारलेली ही 'रंगमुदा' आहे. ज्याला नाटक आवडतं त्या प्रत्येकानं वाचायलाच हवं; असं हे पुस्तक आहे.
...........

रंगमुद्रा

लेखक : माधव वझे
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने : ४२०
किंमत: ३२५ रुपये

0 comments:

Post a Comment