Showing posts with label इतर. Show all posts
Showing posts with label इतर. Show all posts

पॅरामत्ता गर्ल्स :अत्याचारांचा नॉस्टॅलिया

आज जागतिक रंगभुमी दिन ,यानिमित्त महाराष्ट्राबाहेर ,देशाबाहेर काय चाललय ते पाहताना लिहिला गेलेला  हा लेख एक सीमोल्लंघनच..जरुर वाचा
----------------------------------------------------------------------------------------------------------------


'पॅरामत्ता गर्ल्स' या नाटकाच्या संदर्भात मी हे लिहतोय. 'पॅरामत्ता' नावांच सिडनीमध्ये उपनगर आहे. इंग्रजीत त्याचा उच्चार 'पॅरामाट्टा' असा करतात. मराठीत 'पॅरामत्ता' मराठीतल्या 'गोळे' च इंग्रजीत 'गोले' होतं आणि 'भारत' इंग्रजीत 'इंडिया' होतो मग 'पॅरामाट्टा' मराठीत 'पॅरामत्ता' का नाही होतं ?


नाटकांचा खेळ संध्याकाळी होता. मी दुपारीच बाहेर पडलो. मी त्यावेळी डंडास या उपनगरात रहायचो. बस पकडून इस्टवूड रेल्वे स्टेशनवर आलो. आता सेंट्रल स्टेशनला जाणारी ट्रेन पकडायची होती. तिकीट काढुन वाट पहात उभा राहिलो. नकाशा काढला. म्हणजे 'गुगल' वरून काढलेली सेंट्रल स्टेशनच्या आसपासचा भाग दाखवणारी प्रिंट कामलने दिली होती. कामल : वर्गसखी : प्रेमळ : वयांन बरीच मोठी माझं लिखाण जाम आवडायंच तिला. इस्टवुड स्टेशनवर दुपारचा शुकशुकाट होता. शुकशुकाटात कुठंल होतंय नकाशाचं वाचन. ट्रेन आली.


सेंट्रल स्टेशनला दुपारचा शुकशुकाट नव्हता. पण खुप गर्दीही नव्हती. झुंबड, रेटारेटी वगैरे तर सोडाच.


तिकिट स्वाईप करून स्टेशनबाहेर पडलो. रस्त्यावर येऊस्तोवर दोन भिक न मागणारे भिकारी लागले. एक गिटार वाजवत होता, दुसरा नुसतीच गिटार. इथले भिकारर केविलवाणे नाहीत. त्यांच्याकडे भिकविश्वास आहे. मग काही कपडयांची, बुटांची दुकांन, एक-दोन केक - सॅडविच विकणारे स्टॉल लागले. तेथील विक्रतेपण विश्वासानं वावरत होते. मुख्य रस्त्यावर आलो. वाहंन सुसाट. पण तो वेग विश्वास पुर्ण होता इथं तिथं लोक थोडी गर्दी सगळयांना सिस्टीमविश्वास होता.


तासभर भटकलो समोर माइक : वर्गसखा : वयानं मोठा पण कामलापेक्षा लहान आणि कामलच्याउलट त्याला माझं लिखाण आवडायचं नाही
'' हाय माइट, हाव्वा यु ?'' म्हणाला
'' गुड जस्ट हॅगींग अराऊंड हिअर व्हेअर इज एकसाटली द थियेटर फॉर द टुनाटस शो ऑफ 'पॅरामाट्टा'?''
मी गोंधळात विचारलं.


'' ओह ! डोंनो एकझॅ सॉरी बट स्टील देअ इज टाइम फॉ द शो गो ऍन हॅल्सम ड्रीक्सं गॉट टू गो,सि.था ''
मी पीत नाही हे त्याला खुप दिवसांनी कळंल धक्का बसला होता त्याला.


थिएटर शोधण्यासाठी मी नकाशा काढला नकाशा वाचायचा मला जाम कंटाळा मी एकाला थांबवला त्याला नक्की माहिती नव्हतं पण साधारण कल्पना झाली.


हुडकत, चुकत, विचारत आणि नकाशा न वापरत संध्याकाळ झाली दोन टॅक्सी ड्रायव्हर (त्यांच्या कपडयावरून) दिसले एक कटयावर बसलेले जवळ गेलो वास आला भरपूर ढोसली होती पण बऱ्यापैकी शुदिधत वाटलो पत्ता विचारला. दोघांनी जवळच्या मार्गावर वाद घातला मी घाबरला होतो.जस त्यांनी मला असं जा म्हंटल तसा मी सटकलो चालत चालत राहिलो शेवटच्या वळणाला अरूद रस्ता लागला दोन्ही बाजुला घरं होती जुनी कौलारू दगडी वाडयागत भासणारी बारकी होती एका मागोमाग काही घर गेल्यानतर एक थोडेसेच बारके घर लागले त्यावर होत : वेलव्हर थियेटर


दबकत आत शिरलो मागे पुढे ऑस्ट्रेलिय होते. कॉलमधली ही गर्दी बघुन जरा धीर आल एका कोपऱ्यातल्या बारवर दोन चटपटीत तरूण दारू सर्व्ह करत होते एवढयात टयुटर जेन मेसर ने हाक मारली शिरीष वुइ आ हिअ जरा आणखीन धीर आला. वर्गातले आणखीन काही जण दिसले.


बेन (बेंजामिन) म्हणाला 'हाय' 'पॅरामत्ता गर्ल्स' पहाणं हे आमच्या क्रीयेटीव्ह रायटींग कोर्सच्या अभ्यासक्रमाचा एक भाग होतं.


'बेलव्हर थियेटर' ने हे नाटक निर्माण केलं होतं ऍलाना व्हॅलेनटाइन ही नाटकाची लेखिका नाटक सुरू व्हायची वेळ झाली. जिन्यातुन वर आलो बरोबर बेन होता मागे बाकीच.


तिकिट डोअरकीपरला दाखवुन आत शिरलो प्रवेशदारापासुन थोडया अंतरावर खर्ुच्यांची पहिली रांग तिथुन उतार उतारावर पायऱ्या प्रत्येक पायरीवर खर्ुच्यां आणि मग आली. नाटक करण्याची प्रत्यक्ष जागा (लाकडी) मला व बेनला पुढुन दुसऱ्या रांगेत जागा मिळाली


बेनन यापुर्वी असं थिऐटर पाहिल नव्हंत त्यानं पाथहलं होतं ते ऑपेरा हाऊस ऑपेरा त्यांन केला होता असं त्यानं मला सांगितल उच्चार नीट कळत नसल्यामुळे त्याला कान देऊन ऐकलं या किंवा अशा इतर बाबीमध्ये आपण परदेशी इंग्लिश लोकांबरोबर असं काळजीपुर्वक खरंतर दबकुनच वागतो.


साणारण 14 -15 वयाची मुलगी गणवेशात व कागद इत्यादी गोष्टीच्या ढिगात बसलेली रंगमंचावर दिसु लागली प्रेक्षकातला अंधार वाढला नाटक सुरू झालं


नाटकांची थोडी माहिती उपगोदरच करून घेतली होती हे नाटक 'पॅरामत्ता गर्ल्स' होम या साधारण 50 ङ्ढ 55 वर्षापुर्वीच्या सिडनीतील लहान मुलींच्या हॉस्टेल मध्ये मुलींवर झालेल्या कु्रर अत्याचारांवर आधारीत आहे. बिघडलेल्या किंवा वाममार्गाला लागु शकतील अशा मुलींना इथं बदीवान बनवुन त्याच्यांत सुधारणा घडवण्याचे प्रयत्न व्हायचे
त्या मुली आता साडीतल्या बायका झाल्यात त्या एकत्र येऊन या हॉस्टेलला भेट देतात.या रियुनियन च्या प्रसंगा पासुन नाटक सुरू होतं


अशा 5-6 बायकांनी एकमेंकाना हाय करीत मिठी मारत रंगमंचावर प्रवेश घेतला विशेष नेपथ्य नव्हतंच हॉस्टेलच्या गेटची सावली रंगमंच्यावर पडलेली दाखवली आणि हॉस्टेल उभं झालं.


रूदार्थाने बिल्कुल सुदंर नसलेली म्हणजे साठ वय स्पष्ट दिसत होती रंगानी गोरी नसलेली बाई संवाद होता थेट प्रेक्षकांना उद्देशुन मी कानात प्राण ओतले.


या बायका आपल्या क्रुर आठवणींना आठवतात व्यथा मांडत नाहीत त्या भिकाऱ्यासारखंच केविलवाण्य किंवा दयनीच होणं टाळतात एकमागोमाग अत्याचारांचा पट उलगडतो कधी अशा प्रसंगातुन


एक बाई हॉस्टेलमधल्या मुलीच्या भुमिकेत शिरते म्हणजे नाटकात नाटक. दुसरी बाई डॉक्टरची भुमिका करते मुलगी कपडे न काढता नागडी होते म्हणजे स्कर्टखाली हात घालुन अंडरपँट काढते आणि पाय फाकवुन झोपेत डॉक्टर तिच्या फाकवेलेल्या पायांवर पांढरे कापड घालतात बाकीच्या मुली सभोवताली उभ्या राहिलेल्या असताना डॉक्टर पांढऱ्या कपडयामध्ये हात घालुन मुलीची तपासणी करतात मग रिपोर्ट सांगतात डॉक्टरांचा कोणत्याही मुलीचा रिपोर्ट सारखाच असतो : या मुलींची वारंवार ठोकाठोकी झाली आहे ती मुलगी नाही नाही ओरडते काही उपयोग नसतो. मुलगी बिघडलेली ठरते आणि तिच्यावर आणखी सुधारणा होतात
पट उलगडतो कधी अशा गाण्यातुन :-
मला झवलंय जर्मन रशियन माणसांनी आणि चिनी व जपान्यांनी सुद्धा आलिये मी परत ऑस्ट्रेलियाला तुमच्यासारख्या भडल्याकडुन झवुन घ्यायला तर कधी अशा संवादातून : -


'' लहान मुलांना '' जनावंर म्हणा. जनावरांसारखं वागवा ती बनतील यातील नाटकातील उपरोध छान बोचराय या बायका आपल्या अघोरी भूतकाळाकडे भावनाशून्य होऊन बघतात. चिड, दु:ख, वेदना आहे. पण कोरडेपणा जास्त आहे. आणि तोही उपरोधाचे अंग घेऊन.


' ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील प्रत्येक वाईट मुलगी कधी ना कधी यातून गेलीय नाटकातल्या या वाक्यातनं या अत्याचाराची व्याप्ती व गांभीर्य कळंत पण यावर कोणी फारसं लिहिलं वा बोललं गेलं नाही व जात नाही कामल नंतर एकदा म्हणाली होती शिरीष' ऑस्ट्रेलियामध्ये असं काही झालं असेल असं तुला स्वप्नातपण वाटलं नसेल ऑस्ट्रेलिया असा बराच काळा इतिहास आहे. पण तो जगासमोर आणला जात नाही. दबवला जातो ऍलाना व्हॅलेनटाइन या लेखिकेन 'पॅरामत्ता गर्ल्स' प्रकाशात आणंल आणि ऑस्ट्रेलिय लोकांचा दाभिंकपणाही
- शिरीष

भडकमकर करीअर गायडन्स वर्ग- नाट्यसमीक्षक व्हा!


खास दिवाळी निमित्त रंगकर्मीचे एक जाणकार लेखक भडकमकर मास्तर यांनी नाट्यसमीक्षकांवर लिहिलेला हा हुमासदार लेख.

या लेखाद्वारेच सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. !

हे करीअर निवडण्या आधी आम्ही पालकांशी चर्चा करतो, कधी कल चाचणी ( ऎप्टिट्यूड टेस्ट) सुद्धा घेतो...आमच्या पाहणीत असे आढळून आले आहे की सामान्यत: काही विशेष गुण असलेली मंडळी यात फ़ार उंची गाठतात...नाही, म्हणजे आम्ही त्यांना शिकवतोच पण स्वत: कडे काही खास असलं तर आम्हालाही मेहनत घ्यायला मजा येते...
उदा. १. ही मुलं लहानपणापासूनच स्वत:ला कोणीतरी विशेष व्यक्तीमत्त्व समजतात, त्यांचा रथ जमिनीवरून २ इंच चालतो....
२. शाळेत ही मुले मास्तरांना सतत नडतात, शंका विचारतात आणि स्वत:च्या बुद्धीवैभवाचे प्रदर्शन करतात.
३.त्यांना खेळापेक्षा खेळाच्या कॊमेंटरीत, सिनेमा पाहण्यापेक्षा आणि गाणी-डांस स्वत: करण्यापेक्षा त्यावरील चर्चेत जास्त रस असतो.
असा एखादा हिरा आमच्या पाहण्यात आला तर आम्ही त्याला उत्तम पैलू पाडून सहज नाट्यसमीक्षक बनवू शकतो.....
सुरसुरी : खर्‍या समीक्षकाला अशी सतत सुरसुरी येत राहिली पाहिजे की आता कोणाच्या कलेची वाट लावू... जीभ अशी लवलवायला पाहिजे, लेखणी थरारली पाहिजे...
बोटं नुसती कीबोर्ड वर पडायला आसुसली पाहिजेत... असा कोणी लेखक, नट निर्माता बर्‍याच दिवसांत सापडला नाही तर आतून असं तुटलं पाहिजे, ती तळमळ जाणवली पाहिजे.....
एक लक्षात घ्या की आमच्या क्लासमध्ये अमुक अमुक ची भूमिका आवडली, यांची कामे ठीक्ठाक असली सपक आणि गुळमुळीत समीक्षा लिहिणारे नाट्यसमीक्षक आम्हाला घडवायचेच नाहीयेत...
आम्ही घडवणार तडफ़दार, ज्ञानी समीक्षक..
नवीन समीक्षकांसाठी टिप्स...
१. कोणत्याही कलाकृतीचं तोंडभरून कौतुक करायचं सोडून द्या...तोंडभरून काय साधं सुद्धा कौतुक करू नका...
२.महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटक कितीही विनोदी असो / कारुण्यपूर्ण असो/वीरश्रीयुक्त असो, तोंडावरची माशी न हलवू देता अनेक तास ओंजळीत चेहरा ठेवून निर्विकारपणे बसता आलं पाहिजे.
३.एखादे काम कितीही आवडले तरी कौतुकाचा कमाल शब्द म्हणजे बरा/ बरी हाच... पण लगेच त्यापुढे खचवणार्‍या वाक्यांची लाईन लावता आली पाहिजे.......
उदाहरणार्थ : सिचुएशन बघा... नाटक संपलंय आणि एक नट अप्रतिम काम करून आत्ताच शेकडो प्रेक्षकांच्या टाळ्या , हशे मिळवून तुमच्यापुढे अंमळ तरंगतच आलाय आणि त्याची जाम इच्छा आहे की तुम्हीसुद्धा त्याचे कौतुक करावे.. पण नाही, इथेच तर संयम पाळावा...तो तुमच्या कौतुकाची वाट पाहतोय.....पण त्याच्याशी त्याचे काम सोडून इतर दुनियाभरातल्या सर्व गोष्टींबद्दल उदा. हवामान, पाऊस, आंब्यांचा सीझन,सचिनची इन्जुरी, नर्मदा बचाव आंदोलन, इ.इ. बोलावे... मग तो जर जमिनीवर येतो आणि स्वत: विचारतो , " तुम्हाला काम कसं वाटलं सर?"....मान हलवत म्हणावे, " हं..आवडलं लोकांना ...( मग मोठा विराम, त्याचा चेहरा पडतो, आपला खुलतो ) मला तर काय ऐकूच आलं नाही,.. खरंच... अभिनय जरा बरा पण शब्दोच्चार अत्यंत वाईट,इतके गावरान उच्चार?? , सुरुवातीला एनर्जी किती कमी पडत होती शेवटी शेवटी तर संपलीच...आहे, पण बरं होतंय बरंका...करा करा "
४.सरावासाठी नवे नवे लोक निवडावेत...सुरुवातीलाच प्रस्थापितांशी पंगा नको...गॅदरिंगची वार्षिक नाटके करणारे तर हक्काचे गिर्‍हाइक असतात, व्यवसाय सांभाळून स्पर्धा करणारे हौशी कलाकार सरावाला फ़ार बरे....एखादा उत्साहाने फ़ुरफ़ुरणारा हौशी कलाकार पुढ्यात आलाच तर साळसूदपणे विचारावे, " का करता तुम्ही नाटक?" तो आधी गांगरतो पण मग ".... रंगभूमीची सेवा, माझी आवड जोपासायला, माझ्यातली कला पडताळून पहायला आम्ही एकत्र येऊन सगळे नोकरी - व्यवसाय सांभाळून ..." असं काहीसं भंपक बोलायला लागतो...मग त्याला बरोबर रिंगणात घ्यायचा, " अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्‍या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..." असल्या सरबत्तीवर भले भले खचतात ...
.तुम्हाला मोठा समीक्षक व्ह्यायचेय ना?मग हे तंत्र शिकत असताना "सज्जन कलाकारावर अन्याय होतोय" वगैरे फ़ालतु गोष्टी अजिबात मनात आणू नका... शब्द हे तुमचे शस्त्र आहे, आणि ते घासून पुसून लखलखीत ठेवणे तुमचे काम आहे.... उगाच इमोशनल वगैरे व्हायचे काम नाय बरंका...
५. स्वत:ला यशस्वी समजणार्‍या माणसाला नामोहरम करायचे एक विशिष्ट तंत्र आहे.....
नवीन ग्रुप समोर आला की अनुभवाच अभाव म्हणून नावे ठेवायची..., नॊस्टॅल्जिक व्हायचे आणि गंधर्वांची जुनी नाटके किती छान , असे आख्यान लावायचे...
जुना ग्रुप स्वत:चेच नाटक पुनरुज्जीवित करत असेल तर त्या वेळची मजा नाही...किती वर्षे तेच तेच करणार तुम्ही?? आता सत्तरीचा धैर्यधर आणि साठीची भामिनी पहायची का आम्ही??
व्यावसायिक नाटके : प्रसिद्धीलोलुपता , प्रेक्षकशरण वृत्ती त्यामुळे तोचतोचपणा.. प्रयोगाचा अभाव..
प्रायोगिक नाटके : प्रेक्षकांचे पाठबळ नाही, रिकाम्या थिएटरात कसले प्रयोग रंगणार?
विनोदी : थिल्लर उथळ पांचट पाचकळ.
थ्रिलर : नुसते मोठे सन्गीत वाजवले दर दोन मिनिटाला आणि लाईट कमी जास्त केले की थ्रिलर होते काय रे नाटक?
रोमेंटिक : शारिरीक लगट आणि कामुक हावभाव म्हणजे कलाकारांमधील केमिस्ट्री नव्हे....
कोणासमोर कोणाचे कौतुक करायचे याचीही एक गंमत आहे.
संगीत नाटकाला गेलात की वास्तववादी नाटकांचे कौतुक करायचे.. त्यांच्यापुढे संगीत नाटकांचे कौतुक करायचे...विनोदी नाटक / सस्पेन्स नाटक , प्रायोगिक / व्यावसायिक अशा त्या जोड्या आहेत.
६.कोणी माणूस मला अमुक तमुक स्पर्धेत अमुक तमुक बक्षीस मिळालं वगैरे सांगायला लागला की लगेच गावोगावी, गल्लोगल्ली भूछत्रांसारख्या उगवलेल्या स्पर्धा, त्यातलं राजकारण , वशिलेबाजी, भ्रष्टाचार, पैसेखाऊ परीक्षक असा जीभेचा पट्टा सैल सोडावा.... वाट्टेल ते बडबडावे.. झलक पहा, "काही उपयोग नाही रे.... आजपर्यंत असल्या शंभर स्पर्धांमध्ये शेकडो बक्षीसे वाटली गेली पण मिळाला का महाराष्ट्राला नवीन नटसम्राट ? अरे शेक्स्पीअर आणि कालिदास काय तुमची लेखनस्पर्धा जिन्कले होते?" ........खचलाच सांगणारा...
७. होतकरू समीक्षकांना एक भीती नेहमी वाटत असते की कोणी उलटून काही बोलले तर?? की "बाबा रे, तू किती नाटकांतून कामे केलीस? तू किती नाटके डिरेक्ट / प्रोड्यूस केलीस??:"... घाबरायचे नाही, कोणी काही विचारत नाही... जेम्स बॊंडला जसे लायसंस होते मारण्यासाठी तसे असते समीक्षकांचे... आता नीट बघा, वरील प्रत्येक उदाहरणात तुमचा स्व सुखावतोय..बघा स्वत: काहीही न करून दाखवता सेल्फ़ एस्टीम वाढवणारे हे करीअर किती महान आहे, हे तुमच्या आता लक्षात यायला लागले असेल ...
८. एखादे फ़ुटकळ वर्तमानपत्र पाहून त्यात लिहायला सुरुवात करावी.. होतकरू नाट्यसमीक्षकाचा अजून एक मोठा प्रॊब्लेम म्हणजे सोपं लिहू की अवघड?? सोपी समीक्षा लिहून सगळ्यांना कळली तर जग काय म्हणेल?? खरंय.... यशस्वी समीक्षकाने आपली समीक्षा सामान्यांना कळेल अशी लिहू नये....खाली दिलेले काही ठराविक शब्दसंच आहेत, त्यांचा अभ्यास आणि वाक्यांत उपयोग आम्ही घोटवून घेऊ.
उदाहरणार्थ...
> चौकट मोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न / रूढ संकेतांचे उल्लंघन करण्याचे धैर्य हे व्यक्तिरेखेच्या आत्मवंचनेला तारून नेते..
>आशयघनता आणि अनुभवातील तीव्रता मांडण्याचा अट्टाहास मुख्य शोकात्मिकेच्या संकल्पनेला मारक ठरतो..
> समाजमनातील क्रूर बेगडी नैतिकता बन्दिस्त सुटसुटीत आणि नेमक्या पद्धतीनी मांडली आहे पण त्यामुळे ती क्रुत्रिम वाटते.
> अर्थघटन आणि स्वरूपनिर्णय करताना मंचसज्जेला आणि प्रकाशयोजनेला अनाठायी प्राधान्य
> वास्तववादी नाटकात वापरलेली प्रतीकात्मक व्यक्तिरेखाही संघर्षाचे मूळ शोधण्याचा व्रुथा प्रयत्न करते
> संहितेची प्रयोगक्षमता, आशय, बाज /घाट यादृष्टीने पाहता मुख्य विषय पोचवण्यात कलाकारांना आलेले अपयश सतत सलते...
आता या वाक्यांचा अभ्यास करा...
> माणूस का लिहितो?? सांग ना... बघ हं ..म्हणजे एकीकडे सर्वसामान्यांच्या नेणीवा-जाणीवा आणि दुसरीकडे एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना माझ्या स्वत्त्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोन्हींचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया म्हणजे लेखन.....
अशा लेखनाचा फ़ायदा असा असतो की नाटक चांगले की वाईट असे काहीही न लिहिता, कोणताही पवित्रा न घेताही समीक्षेची लांबी वाढू शकते...
९. समजा तुम्ही एखाद्या लेक्चरमध्ये किंवा परिसंवादात अडचणीत सापडलात.... उदाहरणार्थ तुम्ही वास्तववादी नाटकांना एका परिसंवादात हाणत आहात, आणि एकदम कोणीतरी विचारले, ": अहो पण तुम्ही गेल्या वेळी तर त्यांचे कौतुक केले होते?" अशावेळी गडबडून न जाता पुढील तंत्र तुम्हाला वापरता येईल, संकटातून सुटण्याची पळवाट किंवा गनिमी कावा म्हणूनही याचा वापर होऊ शकतो...
सोपं असतं, मुख्य विषय सोडून गाडी भलत्याच दिशेला न्यायची, ... झुडपांशेजारी बडवाबडवी करायची.." हो, हो, मी विषयावर येतोच आहे" असं अधून मधून म्हणायचे, एकदम... "भरतमुनींचा नाट्यविचार, न्यूयॊर्क ब्रॊडवे थिएटर सारखी आपल्या रंगभूमीला उन्नतावस्था आणायची असेल तर काय केले पाहिजे इ.इ. " विषयावर घसरायचे..
त्यासाठी देशी विदेशी लेखकांची, रंगकर्मींची, विचारवंतांची वगैरे नावे योग्य जागी टाकता यायला हवीत....घाबरू नका, फ़ार अभ्यास करावा लागणार नाही.. याबद्दलच्या इन्स्टंट नोट्स आमच्या संस्थेतर्फ़े दिल्या जातील.
(या Tangent technique साठी ही माहिती फ़ारच आवश्यक आहे....)
उदाहरणार्थ
>कालिदास, भवभूति, शूद्रक यांच्या नाटकांचे बेसिक प्लॊट्स... त्यांच्यातील तुलना...
>१९ व्या शतकातील रशियन राजकीय स्थितीत तात्त्विक आणि नैतिक प्रश्न उपस्थित करणारे फ़्योडोर डोस्टोएव्स्की चे लेखन...
>कॊन्स्टन्टिन स्टॆनिस्लाव्ह्स्की आणि त्याची मेथड ऎक्टिंग
>लायोस एग्रि आणि त्याच्या आर्ट ऒफ़ ड्रामॆटिक रायटिंग या पुस्तकाच्या नोट्स....
> एरिस्टॊटल, प्लेटो, आणि सोफ़ोक्लीस यांचा प्राचीन ग्रीक रंगभूमीशी संबंध...
> ब्रॊडवे म्युझिकल्स इन न्यूयॊर्क ... अ ब्रीफ़ हिस्टरी
>बंगाल, केरळ आणि मणिपूर भागातील रंगकर्मींचे काम... रतन थियाम यांचे रिपर्टरी थिएटर
आता थोड्या अनुभवी समीक्षकासाठी काही टिप्स....

१. कंपू आणि कौतुक,
.. कधी कधी कसे असते की लेखक दिग्दर्शक दुसर्‍या कंपूचे असतात आणि कलाकार, तंत्रज्ञ आपल्या कंपूचे असतात....अशा वेळचे परीक्षण असे लिहावे...
>नाटक मंचसज्जा,प्रकाशयोजना अशा तंत्रात बरे असले तरी लेखकाला आपण का लिहित आहोत हेच न कळल्याने आणि दिग्दर्शकाची मांडणीवरील पकड घट्ट नसल्यामुळे गुणी कलाकारांची अवस्था वादळात भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे.
किंचित लोकप्रिय लोकांना सतत शिव्या द्याव्यात.... तो आपल्या कंपूत यावा म्हणून त्याला प्रेशर आणावे....
२. विद्यार्थी जवळ बाळगावेत .... स्वतंत्र विचारसरणीचे नकोत, सांगकामे बघून घ्यावेत...पुस्तकांच्या रीसर्च ला किंवा लेखनिक म्हणून मदत होते, पुस्तक प्रूफ़रीडिंग झाले की त्याला हाकलून द्यावे आणि नवीन विद्यार्थी ठेवावा.
विद्यार्थ्यांना कामाला लावून कोणते लोकप्रिय नाटक कोणत्या फ्रेंच किंवा स्पॅनिश नाटकावरून ढापले आहे, त्याचा सदैव पाठपुरावा करावा....
३. स्ट्रगल करणार्यांना लेखकांना , नटांना बघू, भेटू, बसू, बोलू म्हणत झुलवत ठेवावे, किंवा चक्रमसारखे वागून पळवून लावावे.. आणि शार्प आणि टॆलंटेड नवयुवकांची गरीबांचे तेंडुलकर, गल्लीतले लागू किंवा किंचित कानेटकर, कॉपी करणे म्हणजे लेखन नव्हे किंवा मिमिक्री म्हणजे अभिनय नव्हे..अशी थट्टा उडवणे मग ते तुमच्याकडे फ़िरकत नाहीत...
नवीन नवीन ग्रुप्स ना उडवून लावावे, त्यांचे नाटक कधीही पहायला जाऊ नये... गेलाच तर चालू नाटकातून उठून जावे.. किंवा कोणालाही न भेटता मध्यंतरात निघून जावे, किंवा मध्यंतरात चारचौघात वाकडा चेहरा करून " हं...ssss ठीकच होतंय " असे म्हणावे..
४. सभा संमेलने अध्यक्षपद, ... नियमित नाट्यसंमेलनाला जावे, तिथे आदर की काय तो पुष्कळ मिळतो....
स्वत:च्या गावाचे/ गल्लीचे/ सोसायटीचे/ बिल्डिंगचे स्पेशल नाट्यसंमेलन काढून त्याचे अध्यक्षस्थान भूषवावे...
फ़िती कापाव्यात ...पैसे घेऊन बूटीक आणि सलूनचे उद्घाटन इ. सर्व गोष्टी न लाजता कराव्यात ...
५. कितीही अगम्य विषय असले तरी दर वर्षी किमान दोन पुस्तके छापावी... उदा.
>संगीतनाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रावर झालेला परिणाम...
>ठाकर समाज आणि विसाव्या शतकतील मिथके.......
>बदलत्या सामाजिक परिस्थीतीचे, सीरियल्स आणि सिनेमाचे नाट्यव्यवसायावर होणारे दूरगामी परिणाम.
>कोकणी रंगभूमीवर वापरलेल्या गेलेल्या शिव्यांचा कोश
> पाऊस या विषयावरील नाटकांचा कोश
७. प्रस्थापितांशी स्पॊन्सर्ड पंगे घ्यावेत, स्वत:च्या जीवावर नको... तुलनेसाठी सोफ़ोक्लीस किंवा शूद्रक घ्यावा... समोरच्याला पार झोपवावा...
८. नाट्यसंमेलनात भाषणे करावीत...ज्येष्ठ समीक्षक "...." यांनी "...." या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले असे ओळखीच्या पत्रकारांना सांगून छापून आणावे... मोकळ्या प्रेक्षागृहात नसलेल्या प्रेक्षकांसमोर का होईना, टुकार परिसंवादात भाग घ्यावा...
९. अत्यंत चक्रम वागायला शिकावे..... तथाकथित हुशार माणसाचे चक्रम वागणे लोक गोड मानून घेतात...
उदाहरणार्थ : वेळ न पाळणे... विसराळूपणे वागणे ( प्रत्येक भेटीत " आपण नागपूरला भेटलो होतो का? " असे विचारावे.....)
विचित्र विषयावर भाषणे करावीत ....( उदाहरणार्थ स्पर्धेच्या बक्षीस समारंभात भारताची अण्वस्त्रसज्जता यावर अभ्यासपूर्ण भाषण करावे)
समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे...
या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्यात तर एक थोर नाट्यसमीक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.....आम्ही अनेकनाट्यसमीक्षक घडवले आहेत..घडवत आहोत...( आजकाल अनेकानेक क्लास निघत आहेत, पण ओरिजिनल एकच, भडकमकर्स करीअर गायडंस क्लास) )...लोकहो, उठा जागे व्हा.. कमी कष्टात भरपूर आदर प्राप्त करा,, प्रचंड प्रसिद्धी मिळवा...
या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...
bhadakamakar'scareermanagementsystems.org/naaTyasameekShaa
--------------------
संपुर्णत काल्पनिक...

मागोवा...मराठी रंगभूमीच्या वाटचालीचा



मध्यंतरी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा फोन आला. शिवाजी विद्यापीठाच्या 'शाहू संशोधन केंद्रा'ची धुरा डॉ. विलास संगवींच्या नंतर डॉ. पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. शाहू संशोधन केंद्रानं आता कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास प्रसिध्द करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. अशा प्रकारचा प्रकल्प पूर्ण करायचा तर त्यासाठी अनेकांचा सहयोग मिळवणं हे ओघानं आलंच. फोन त्याअनुषंगानं होता. कोल्हापुरातील गद्य नाटकं व  रंगभूमी याबद्दलचे काही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध होऊ शकतात का हा डॉ. पवारांनी माझ्यासमोर टाकलेला सवाल होता.
डोक्याला नवं खाद्य मिळालं. पुस्तकं धुंडाळायला सुरुवात झाली. आमदार पी.बी.साळुंखेंच्या संग्रहातलं 1930 सालचं एक पुस्तक हाताला लागलं. बडोद्यातील सेंट्रल लायब्ररीचे ग्रंथपाल आणि लेखक गणेश रंगनाथ दंडवते यांनी लिहिलेल्या या पुस्तकात अनेक गमतीचे आणि आज विस्मरणात गेलेले संदर्भ वाचायला मिळाले. महाराष्ट्रात पूर्वीच्या काळी सार्वजनिक अथवा खाजगी उत्सवप्रसंगी लळिते सादर होत. बहुरुपे, गोंधळ व लळितांमधूनच पुढे मराठी रंगभूमी अवतरली असे मानणारा एक वर्ग आहे. लळितांविषयी दंडवतेंनी आपल्या पुस्तकात म्हटलंय, ''19 व्या शतकाच्या आरंभी मुंबई मुक्कामी दादोपंत नावाच्या एका मराठा गृहस्थाने लळिते करुन दाखवण्यास सुरुवात केली. त्याच्या हाताखाली शिकून सावजी मल्लप्पा, बडोद्याचा वाघोजीबुवा व मुंबईचा पाटीलबुवा असे तिघे इसम तयार झाले. पुढे त्यांच्यात फाटाफूट होऊन सावजी पुण्यास व वाघोजी बडोद्यास निघून गेला. पाटीलबुवा मुंबईतच राहून पुष्कळ वर्षे लळितात आपले नाव गाजवित राहिला. पाटीलबुवाच्या हाताखाली शिकून जी मंडळी तयार झाली त्यात कोळभाटवाडीतील विठोबा रोटकर आगरी याचे लळित व विशेषेंकरून त्यातील मच्छिंद्र आख्यान फारच उत्तम होत असे व ते पाहाण्यास सर्व शहर लोटे.  लळिते ही जरी धार्मिक स्वरुपाची व वेदांतपर असली तरी त्यात अनेक पात्रे रंगभूमीवर आणता येत. छडीदार, भालदार, चोपदार, ब्राह्मण, वासुदेव, दिंडीगण, भाट, परदेशी, जंगम, बैरागी, काशीकापडी, वाघ्यामुरळी, सौरीमुंडा, कैकाडीण, गोंधळी, हरीदास, आराध्ये अशी पंचवीस-तीस सोंगं रंगभूमीवर येऊन आपापली कामं करुन जात.''
महाराष्ट्रातील नाटयकलेची सुरुवात सांगलीतून झाली असाच उल्लेख दंडवतेंनी आपल्या पुस्तकात केला आहे. कर्नाटकातील कानडी नाटके पाहून तशी नाटके मराठीतही व्हावीत अशी कल्पना कै. श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन सांगलीकर यांच्या मनात दीर्घकाळ घोळत होती, आणि त्यांनी विष्णूपंतांना म्हणजे विष्णू अमृत भावे यांना मराठी रंगभूमी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. हे सांगताना दंडवतेंनी म्हटले आहे, ''सन 1842 च्या सुमारास सांगलीस भागवत नावाची एक कानडी नाटकमंडळी आली होती. तिचे प्रयोग सांगलीकरास आनंदवीत असता ते कानडी प्रयोग पाहून यजमान अप्पासाहेब व आश्रित विष्णुदास या उभयतासही एकदम चालना मिळाली व त्याच्या दुसऱ्या वर्षीच भावे यांनी आपले पहिले पौराणिक नाटक 'सीतास्वयंवर' रंगभूमीवर आणिले आणि पुढे तर आपला पौराणिक रत्नाकर मंथून त्यातून फार नाही तरी 40-50 रत्ने बाहेर काढिली.'' दंडवतेंनी विष्णूपंतांच्या अंगी असणाऱ्या विविध कला कौशल्यांवरही प्रकाश टाकलेला आहे.
त्या काळातील नाटयप्रयोगांविषयी जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार मराठी रंगभूमी त्यावेळी अगदी प्राथमिक अवस्थेत होती. सार्वजनिक देवालये, एखाद्या मोठया वाडयाचा चौक किंवा एखादे मोठे पटांगण अशा ठिकाणी नाटयप्रयोग होत. मागे एखादा काळा पडदा लावून पात्रे मेकअप् करुन पडद्यासमोर येत. भाव्यांच्या नाटकपध्दतीचे वर्णन मराठी रंगभूमी नावाच्या पुस्तकात केले आहे ते असे : प्रथम सूत्रधाराने पडद्याबाहेर एकाबाजूस उभे राहून मंगलाचरण करावयाचे. यात ईशस्तवनपर काही पद्ये तालसुरात म्हणावयाची. नंतर वनचराचा वेष घेऊन विदूषकाची स्वारी बाहेर यावयाची. त्याचे वेडेवाकडे नाचणे झाल्यावर सूत्रधाराचा व त्याचा विनोदपर संवाद व्हावयाचा. यात उभयतांची मुलाखत व ओळखदेख होऊन नाटक कोणते करावयाचे हे सूत्रधाराने सांगावयाचे व पात्रांची सिध्दता आणि व्यवस्था ठेविण्याविषयी त्यास बजवावयाचे नंतर गजानन महाराजांचे स्तवन करुन पडदा उघडावयाचा. पडदा उघडल्यावर सूत्रधाराने गजानन महाराजास वंदन करुन नाटकामध्ये विघ्ने येऊन नयेत अशा विषयी त्यांची प्रार्थना करावयाची व गजानन महाराजांनी आशीर्वाद दिलयावर पडदा पडावयाचा. नंतर ब्रह्मकुमारी सरस्वती हिचे स्तवन करुन तिला रंगभूमीचे ठायी पाचारण करावयाचे. तिचे आगमन झाल्यावर पात्रांचे ठायी धीटपणा व वक्तृत्त्वशक्ती असावी असा वर मागून घेऊन तिचे विसर्जन करावयाचे व नंतर नाटकास आरंभ करावयाचा. प्रारंभ करतेवेळी सूत्रधाराने नाटकात कोणता कथाभाग येणार आहे व आरंभीचा पसंग कसा आहे याचे पद्यातून वर्णन करावयाचे व नंतर पात्रांनी रंगभूमीवर भाषण करावयाचे.
सुरुवातीच्या काळी नाटकांची छापील पुस्तके नसल्याने नाटकाचे चालक पौराणिक कथाभागावरुन पात्रांची भाषणे तयार करीत आणि ती संथा दिल्याप्रमाणे पात्रांकडून पाठ करुन घेत. बहुतेक पात्रे अशिक्षित असल्याने त्यांच्याकडून घोकंपट्टी करुन घेतल्याखेरीज इलाज नसे. सांगलीत एकदा नाटकांची सुरुवात झाल्यानंतर अगदी थोडया कालावधीत सांगलीकर, कोल्हापूरकर, इचलकरंजीकर, आळतेकर, उंब्रजकर अशा पाच-सात नाटकमंडळया या परिसरात सुरु झाल्या. मात्र या नाटकमंडळयांविषयी फारसा तपशील उपलब्ध होत नाही. राजाश्रय तुटला आणि 1851 च्या सुमाराला विष्णुदास भावे यांना परगावी जाऊन प्रयोग करणे सुरु करावे लागले. उपलब्ध माहितीनुसार भावे यांनी प्रथम कोल्हापुरात आणि नंतर पुण्यामध्ये आपली नाटकमंडळी नेऊन प्रयोग सादर केले. पुण्यामध्ये झालेला नाटकमंडळीचा हा पहिला प्रयोग हे लक्षात घेतले म्हणजे सांगली-कोल्हापूर परिसरात मराठी रंगभूमीने पाय रोवायला सुरुवात केल्यानंतर जवळपास नऊ वर्षांनी पुणे आणि मराठी नाटकांचा संबंध आला हे स्पष्ट होते. पुणे आणि मुंबईकरांनी नंतर मराठी रंगभूमीसाठी अधिक योगदान दिले असले तरी या सर्वाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांनी केली याचा सार्थ अभिमान आपल्याला असायला हवा.
पौराणिक नाटकांची सद्दी कमी झाली आणि परशुरामपंत गोडबोले, कृष्णशास्त्री राजवाडे, गणेशशास्त्री लेले, शिवरामशास्त्री पाळंदे आदींनी संस्कृत नाटकांवरुन मराठी नाटके लिहायला सुरुवात केली तर महादेवशास्त्री कोल्हटकर, विनायक जनार्दन कीर्तने, नीलकंठ जनार्दन कीर्तने, काशीनाथ गोविंद नातू, सखाराम परशुराम पंडित, लक्ष्मण गोपाळ दीक्षित आदींनी इंग्रजी साहित्यकृतींवर आधारित किंवा स्वतंत्रपणे नाटके लिहायला सुरुवात केली. रंगभूमीवर प्रयोग सादर करण्याच्या दृष्टीने महादेवशास्त्री कोल्हटकरांचे 'ऑथेल्लो' (1857), विनायक जनार्दन कीर्तने लिखित 'थोरले माधवराव' (1861) व 'जयपाळ' (1863), बापूसाहेब भाजेकर लिखित 'मनोरमा' (1871), आनंदराव सखाराम बर्वे लिखित 'हिम्मतबहादुर' व सखाराम परशुराम पंडित लिखित 'शेराला सव्वाशेर' (1867) या नाटकांचे मराठी रंगभूमीने व रसिकांनीही स्वागत केले. कालानुक्रमे महादेवशास्त्री कोल्हटकर यांनी लिहिलेले 'ऑथेल्लो' हे आधी लिहिले गेले असले तरी पहिले स्वतंत्र मराठी नाटक म्हणून विनायक कीर्तने यांनी लिहिलेल्या 'माधवराव पेशवे' या नाटकाला नाटयरसिकांनी विशेष मान द्यायला हवा असे गणेश दंडवते यांना वाटते. कोल्हापुरकरांसाठी अभिमानाची गोष्ट ही की 'माधवराव पेशवे' या नाटकाचे जे प्रयोग त्या काळी झाले ते सर्व इचलकरंजीकर नाटक मंडळींनी सादर केलेले होते.
विष्णुदास भाव्यांच्या काळात निघालेली कोल्हापूरकर नाटक मंडळी, नंतर अनेक पौराणिक नाटके  गाजवणारी शाहू नगरवासी नाटकमंडळी किंवा मराठी रंगभूमीवरचे पहिले स्वतंत्र नाटक  सादर करणारी इचलकरंजीकर नाटक मंडळी या नाटकमंडळींची प्रेरणास्थाने, त्यामधील कलाकार, त्यांनी सादर केलेली नाटके हा सारा इतिहासआपण शोधून नव्या पिढीसमोर अवश्य ठेवायला हवा! शाहूनगरवासी नाटक मंडळीने शेक्सपिअरच्या नाटकावर आधारित व प्रा.वा.बा.केळकर लिखित 'त्राटिका' हा नाटयप्रयोग सादर केल्याच्या आठवणी काही ठिकाणी वाचायला मिळतात. सुमारे 25 वर्षे ही नाटकमंडळी रंगभूमी गाजवत होती. बळवंतराव जोग, गणपतराव जोशी, गोविंदराव सुपेकर अशी शाहूनगरवासी नाटकमंडळीतील काही कलाकारांची नावे आहेत. अन्य कलाकारांविषयी तसेच या नाटकमंडळींविषयी ज्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी ती उपलब्ध करुन दिल्यास कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासातील रंगभूमीविषयक माहिती परिपूर्ण होण्यास मदत होऊ शकेल. कोणी अशी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवेल का?


 उदय कुलकर्णी

रंगकर्मी विशेष- मन हरवलेलं .... मनोरंजन


प्रस्तावना- नाटक हा मनोरंजन विश्वाचाच एक भाग,त्यामुळे मनोरंजन विश्वात सध्या काय चालु आहे त्याचा परिणाम नाटकावर होत राहतोच,म्हणुनच रंगकर्मी व्यवस्थापन मनोरंजन या विषयावरील काही लिखाणही येथे प्रकाशित करत आहे,ज्यायोगे दर्शकाला काही बोध किंवा काही जाणीव होऊ शकेल ज्याचा परिणाम नाटकातही होईल्.तसाच मनोरंजन विश्वाची सध्यस्थिती सांगणारा हा लेख.जरुर वाचा.
------------------------------------------------------------------------------

माणसाचं वैशिष्ट काय आहे बरं? बुध्दी ??असेलही, पण, सर्व प्राणीमात्रांना ती कमी-अधिक आहेच की!   मग काय असेल ?  माझ्या मते 'मन' हे आपले खरे वैशिष्टय आहे.  आपल्याला भावना आहेत. कोणी टोचून बोललं तर आपण दु:खावतो, एखाद्या प्रसंगाने आपण आपण आनंदतो.  आपणचं काय, आपल्या आजुबाजुच्या कोणाला काही झालं, तरी आपल्यावर त्याचे परिणाम होतात.  ही सगळी कशाची किमया?  मनाचीच ना!  म्हणूनच आपण, या मनाला चार फुरसतीचे क्षण मिळावे, त्याला समाधान लाभावे म्हणून एक विश्व उभं केलं, मनोरंजन विश्व!   हे विश्व इतकं फोफावलं, की त्यावर आज हजारो जणांच जगणं चाललय.  अन्न, वस्त्र व निवारा या प्रमाणे मनोरंजन ही एक मूलभुत गरज बनुन गेली.
            
 पण नक्की काय चाललय आज या मनोरंजनाच्या नावाखाली?  चित्रपट, नाटक, दुरदर्शन ही मनोरंजनाची मुख्य माध्यमे!  पण, आपल्या सर्वात जवळचं आणि अतिपरियचयाचं म्हणजे दूरदर्शन!  यावर आपण अनेक मालिका बघतो, पण, त्या का बघतो याची चारं कारण देता येतील का आपल्याला?  आजकाल विविध वाहिन्यावर ''खतरो के खिलाडी'', ''स्पॅटजविला'' सारखे कार्यक्रम लागतात.  त्यात जे प्रकार चालतात ते भयानक असतात.  चार दमडयांसाठी ,प्रसिध्दीसाठी काही तरूणांनी पालींमध्ये -सापांमध्ये उभे राहणे, पटते तुम्हाला?  तसे नुसते पाहून संवेदनशील मनाला त्रास होतो.  पण आजची तरूण पिढी हे कार्यक्रम आवडीने बघते.  सेलिब्रिटीज असे स्टंट करताना पाहून त्यांना काहीच वाटत नाही.  उलट त्याची चवीने चर्चा केली जाते.  यामुळे, आपली पुढची पिढी भावनाशुन्य तर होत नाही आहे ना?
           
हे झाले तरूणांचे, पण आजकाल घरातले सर्व जण ''इस जंगल मे'' ''बिग बॉस'' सारखे कार्यक्रम आवडीने बघतात, इतरांच्या जीवनात चाललेले खेळ बघून आपण आनंदतो.  पण, स्वत:ला एक प्रश्न विचारा?  काय, आपल्याला हे सगळे करायला जमेल?  केवळ आपल्या आनंदासाठी दर वेळेला १५ लोकांना बरेच दिवस ''समाज'' या मूलभूत गरजेपासुन दूर ठेवायचे.  आणि  मग बिग बॉस मध्ये त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला की हसायचे, ही विकृती नाही का? 
            
सहानुभूती ही चीजच आपले मन विसरला आहे की काय?  कोणा एक नटीशी लग्न करायचं म्हणून दहा - बारा तरूणांनी तिच्याबरोबर रहायचं, तिला मनवण्यासाठी कोणतेही प्रकार करायचे.  आज स्त्रीला पटवायला पुरूष जात आहेत, ही नक्कीच बदलाची नांदी आहे,पण त्यात जे प्रकार केले गेले.  ते पाहून आजच्या पिढीत स्वाभिमान आहे की नाही तेच कळेनासे झाले आहे.  आता तर आपलं पोटच पोरं टी.व्ही.वरच्या कार्यक्रमासाठी दुसर्‍याला सांभाळायला द्यायचं... छे! हद्द झाली. .! स्त्री मनाचा एक अविभाज्य कंगोरा म्हणजे माया! पण तीलाच तिलांजली देऊन त्यावर जाहिरातींच्या रूपातून करोडोंचं साम्राज्य उभारायचं?  एकदा शांतपणे विचार करा?  तुमच्यातला मातेला, पित्याला हे पटेल का?  गेले काही दिवस विविध वृत्तवाहिन्यावर ''सच का सामना'' वरून रण पेटलं आहे.  वृत्तवाहिन्या, शशी थरूरने ट्विटरवर लिहावे का?  ''सच का सामना'' चे काय?  अशा गोष्टीवर तास-तास चर्चासत्र ठेऊ शकतात.  पण, त्यांना शेतक-यांच्या आत्महत्येवर  दाखवायला दहा मिनीटांच फुटेज का मिळत नाही?  हा जरी चर्चेचा वेगळा विषय असला तरीही ''सच का सामना'' तुम्हाला रूचतय का?  बातम्यात आपण हजारदा त्याचे फुटेज बघितले.  पण, एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात आपण किती ढवळाढवळ करावी?  तो अँकर म्हणतो की समाजाला सत्य स्विकारण्याची सवय झाली!  पण बाबा रे, मला एक सांग, तु यातल बक्षिस काढून टाकलस, तर किती लोक खरं बोलतील?  आणि, त्यांची ''कन्फेशन्स'' त्यांच्यापुरतीच असुदे ना.  जगाने ती का पाहावीत?  आणि त्यामुळे जे वाईट परिणाम होतात त्याचे काय?दोन चार जीव गेले त्या मालिकेमुळे त्याची भरपाई देणार आहे का ती वाहिनी?  मालिकांबाबत तर न बोलणेच बरे, प्रादेशिक ते राष्ट्रीय .सगळीकडेतीच कथा.  एका पुरूषाला तीन-तीन बायका!  तरी त्यातली एक पतिव्रता! वा पट्टे हो वा !  मान गये आपको!
           
हा तर आता तुम्ही म्हणाल की, ''एवढे सगळं का लिहीलस रे बाबा!'' हो, बरोबर आहे.  मला  या मालिकाविषयी राग नाही.आणि वैयक्तीक आकस तर नाहीच नाही.  आणि, नेहमीसारखे त्यांना फक्त शिव्याही घालायच्या नाहीत.  पण, मला सगळयांनाच एक प्रश्न विचारायचा आहे.  मनोरंजन म्हणजे काय? आत्ता जे चालू आहे त्याला मनोरंजन म्हणायचे का?  मनोरंजनाचे एक मूळ तत्व म्हणजे मनाचे समाधान होणे, हे आहे असे मला वाटते पण, यापैकी किती मालिका बघुन तुम्हाला असे समाधान वाटते?  यातल्या किती मालिका संस्कारक्षम गेला बाजार विचारप्रवर्तक आहेत.  यापैकी एकतरी मालिका आपल्या मनाचा ठाव घेते का?  उदा.  द्यायचे झाले तर पूर्वीच्या काळी ज्या मालिका आल्या मग ती ''गोटया'' असो, ''हम पाँच'' असो, ''सर्कस'' असो वा ''अवंतिका''  या सर्व मालिका आपल्या जीवनावर आधारित होत्या, त्यात आपली वाटणारी पात्रे होती.  त्यांच्या भावनांशी आपण समरूप होऊन जायचो.  त्यांच्या हसण्याने आपण हसायचो, तर त्यांच्या दु:खाने आपण दु:खी व्हायचो. पण, आज तसे घडते का?  आज सगळे कृत्रिम आणि बटबटीत झाले आहे.  त्यातली नैसर्गिकता हरवली आहे.  म्हणजे, आजच्या मनोरंजनातुन मनच हरवलयं.  उरलय, ते फक्त मनोरंजन.आणि प्रश्न म्हणजे हे आपल्याला चालेल का?
            
 या सर्वात तारक मेहता का उल्टा चष्मा, कुलवधू अशा काही मोजक्या मालिका उरल्या आहेत.  ज्या आपल्या जवळच्या नैसर्गिक वाटतात.   पण, हे फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहे.  मानवी मनाचे इतके कंगोरे आहेत?  पण, त्यावर मालिका का बनत नाहीत  ?आजच्या मनोरंजनामध्ये मानवी मनासाठी, मनाबद्दल काही नाहीच आहे का?या दोन मालिकांमुळे इतर १०० चॅनेलवरच्या वाईट मालिकाना टाळता येत नाही.
             
यावर एक ठराविक छापाचे उत्तर मिळते.  रिमोट तुमच्याकडे आहे ना मग तुम्ही पाहू नका त्य मालिका.  मग, करतील ते बंद.  पण मूळ प्रश्न वेगळाच आहे  ना!  समजा 95 टक्के मनोरंजन बंद करायच्या लायकीचे असेल, तर मग काय करायचे?  आणि बघणार्‍यांना थोपवणार तरी किती?  मुळात, म्हणजे प्रेक्षक हा राजा असताना त्यानेच का बदलायचे?  हळूहळू जर तुम्ही त्याची बरे वाईट ठरवायची ताकदच कमी करत असाल तर तो ठरवणार तरी कसा?आजकाल, अनेक पाश्चात्य कार्यक्रमांची जुळी रूपे भारतात येतात, यशस्वी होतात.  त्यांचे अनुकरण करा हो,आमची ना नाही, पण आपली संस्कृती, आपली वैशिष्टये जपणार की नाही?  बरं, कोणालाच पूर्ण पाश्चात्य व्हायचे नाही!प्रत्येकाला दररोज खायला वरणभातच लागतो ,चार दिवस रोज खालल्यावर त्याला पिझ्झा चा विट यायला लागतो.  मग हा तिढा कसा सोडवणार, आणि आमची जी नवी पिढी आहे, तिला त्यापासून कसे वाचविणार?  उपाय तर केला पाहिजे.  त्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. मी आपल्या परीने करत आहेच.  पण त्याचबरोबर अजुन एक गोष्ट केरतोय, देवाजवळ प्रार्थना करतोय, की बाबा रे, या रंजनात पुन्हा एकदा मन येऊ दे रे....

नमस्कार

नमस्कार,

सर्व नाट्यरसिकाना आमचा मनापासुन नमस्कार.
आजपासुन हे संस्थळ www.rangkarmi.com
येथे सुरु झाले आहे
अजुन संस्थळावरील काही विभाग हे प्राथमीक स्तरावर आहेत, या विभागात हळू हळू लिखाण उपलब्ध होईल.
तेव्हा आमच्या या संस्थळाला यशस्वी करा हीच तुमच्या चरणी विनंती.
आभारी आहे.