तर दोस्तानो, तुम्हाला माहित आहेच की कोल्हापूरच्या केदार कुलकर्णी याने नुकत्याच झालेल्या 'झी गौरव' समारंभात 'गंध' या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवाला . सांगायची गोष्ट अशी की केदारदादा हा देवल क्लबचा कलाकार, आणि मी देखील क्लबचाच. त्यामुळे, माझ्या या दोस्ताला सन्मान मिळाल्याचा मला विशेष आनंद. तसे आम्ही गेल्या 1 महिन्यात भेटलेलो नव्हतोच. त्यामुळे, काल त्याला भेटल्यावर त्याची एक अनौपचारीक मुलाखत घेतली. तुम्हा दोस्तांसाठी ही मुलाखत सो एक्स्क्लुजीव केदार कुलकर्णी विथ विनायक पाचलग
मी - केदारदादा, पहिल्यांदा या पुरस्काराबदद्ल तुझे अभिनंदन, मला सांग, तुलास्वतःला बक्षीस मिळेल असे वाटत होते का? महत्त्वाचे म्हणजे नितीन देसाई, सुमित्रा भावे अशा दिग्गजांची स्पर्धा असल्याने दडपण होते का?
केदार - अरे, बक्षीस मिळेल, याची अपेक्षाच नव्हती केली. खरतरं, नॉमिनेशनमिळाल्यावरच आपल काम एप्रीसीएट झालं. म्हणून समाधानी होतो. पण, इथपर्यंत आलोय म्हणटल्यावर बक्षीस मिळावे. अशी, थोडीशी, मनाच्या कोपर्यात इच्छा होतीच. आणि, ती कोणाला नसते. अरे, तुला पटणार नाही. नाव घोषीत झाल्यावर 2 मिनिटे मी स्तब्ध होतो. माझे मलाच काही कळत नव्हते. माझ्या नकळत मी रंगमंचावर गेलो आणि ट्रॉफी घेऊन परत आलो. मग, 5 मिनिटानी भानावर आलो. त्यामुळे, ते सगळे काही वेगळंच होते.
मी - बरं, मला एक सांग। तुला हा पिक्चर कसा मिळाला? आणि, आता विचारकेल्यावर तुला हे यश का मिळाले असे वाटते.
केदारदाः- अरे, ती पण मजा आहे. तुला माहित आहे बघ. 2 वर्षापुर्वी आपण क्लबमार्फत 'छोटयाश्या सुट्टीत' हे नाटक बसवले होते. या नाटकाचा लेखक सचिन कुंडलकर होता. खरेतर, हा विषय हाताळणारी अख्ख्या महाराष्ट्रातली आपली दुसरी संस्था. आणि, हा प्रयोग राज्य नाटय स्पर्धेत नावाजला गेल्यावर त्याचा एक शो पुण्यात ठेवला होता. तेव्हा सचिन आलेला. मग, त्यावेळच्या चर्चेत त्याने तु काम करणार का विचारले आणि मी चित्रपट केला. आणि, 'गंध' चं वैशिष्टय म्हणशील तर गंधमध्ये आम्ही दृश्य चित्र अनुभवातुन प्रेक्षकांना गंधाचा, वासाचा फील द्यायचा प्र यत्न केला आहे. तेसुध्दा तीन टोकाच्या कथानकातून 1) पुणेरी वाडा संस्कृतीतलं कुटुंब - लग्न 2) तर दुसरे एक मॉडर्न फॅशन फोटोग्राफर आणि तिसरं म्हणजे एक प्युअर कोकणी घर. या तिन प्रकारच्या कथा आम्ही योग्यत-हेने जोडू शकलो आणि विशेष म्हणजे, काही प्रसंगानंतर लोक म्हणतात, ''हा आम्हाला बघताना तो वास आल्याचा भास झाला, जाणीव झाली.'' कदाचित या वैशिष्टयामुळेच कदाचित आम्ही 'हरिशचंदाची फॅक्टरी' या प्रचंड अभ्यासाने बनवलेल्या चित्रास मागे टाकू शकलो.
मी - बरं केदारदा, तुला ज्यासाठी आवार्ड मिळाला त्या कलादिग्दर्शनाबद्दल काही सांग कारण माझ्यासह ब-याच लोकांनाअजून 'कलादिग्दर्शन' म्हणजे काय तेच माहित नाही। नक्की हा काय प्रकार आहे आणि तुझा हा पहिलाच प्रयत्न होता का?
केदारदा - अरे विन्या, मराठी चित्रपटाबाबत बोलायचं तर कलाकार, त्यांचे कॉस्टयुम आणि डायलॉग सोडले तर बाकी सगळयाचा समावेश कलादिग्दर्शनात होतो. अरे, पिक्चर लिहिताना त्याचा एक ग्राफ दिग्दर्शकाच्या डोळयात असतो. जो आम्हाला माहित असतो. मग त्यानुसार तसं Environment तयार करावं लागतं. त्या दृश्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. थोडक्यात सांगायच तर, तुला म्हटलं ऑफिसचा सेट लाव. तर, आत्ता आपण बसलोय, इथं पण शुटींग करता येतचं की. पण, त्यावेळी प्रसंग कोणता, मग कशी रचना करता येईल, कोणती रंगसंगती वापरावी लागेल. याचा विचार म्हणजे कलादिग्दर्शन. थोडक्यात म्हणजे कंटेटला एक्झीक्युट करणे. आणि यातलं कौशल्य म्हणजे आपल्याला ग्राफ माहित असतो. पण दिग्दर्शक कोणत्या ऍंगलने तो शुट करणार हे माहित नसतं. आयत्यावेळी, ते बदलू शकतं. म्हणूनच, सर्व बाजून ते प्रीपेअर असावे लागते. आणि, मी पहिल्यांदा 'ॠषीकेश मोघे "यांच्याबरोबर 'अचानक' साठी असिस्टंट म्हणून काम पाहिले. पण, इनडिपेंडंट हा माझा पहिलाच प्रयत्न. म्हणूनच, जास्त आनंद आहे.(यावेळी केदारने खुप माहिती दीली पण ती विस्तारभयाने ती इथे देत नाही आहे)
मी - बरं, आता थोडं तुझ्याबदद्ल? तु या क्षेत्रात कसा आलास? आणि आत्तापर्यंतचातुझ्या प्रवासाबदद्ल थोडे सांग?
केदार - अरे मी पहिल्यांदा नाटकात आलो ते आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्षात म्हणजेजवळजवळ 15 वर्षापूर्वी। त्यावेळी माईम (मुकाभिनय) केले होते. तिथुन मग सुरूवात झाली. 4-5 वर्षे महाविद्यालयात एकांकिका, नाटके केली. मग त्यात बक्षिसे वगैरे मिळू लागल्यावर वेगवेगळे सुरू केले. यानंतर 2000 सालापासून आजपर्यंत मी देवल क्लबशी निगडीत आहे.
मी - बरं मग या काळात तु केलेले महत्वाचे नाटय्प्रयोग, बक्षीसे कोणकोणती?
तसं म्हणशील तर 2003-04 साली मी कॉलेजच्या मुलांना बरोबर 'येत्या काळोखापर्यंत' हे नाटक लिहिले आणि बसवले होते। त्याला आणि क्लबमार्फत म्हणशील तर मी ''भरणी भरपाई'', ''छोटयाश्या सुट्टीत'' " एक युध्द्....'' अशी अनेक नाटके केली. यात सर्वात वेगळे होते ते भरणी भरपाई. कारण यात फक्त डॅडो आणि स्टेप्स वापरून आम्ही 10 ते 11 वेगवेगळी ठिकाणे दाखवायचा प्रयत्न केला होता. आणि सर्वांत गाजलेले म्हणशील, तर ''छोटयाशा सुटटीत'' या नाटकाला राज्य नाटय स्पर्धेत मध्ये 4 पुरस्कार मिळाले होते. त्याचे ठिकठिकाणी प्रयोगही झाले. यातले 2 पुरस्कार मला होते.
मी - मला सांग, यातला तुला सर्वांत जास्त चॅलेंजिंग, आवडलेला प्रयोग कोणता?
केदार - तसं म्हणशील, तर मला स्वतःला खूप चॅलेंजिंग वाटलेला वा म्हणूनच आवडलेलाम्हणजे 'माझ्या प्रीय मित्रास "यात मी 70 वर्षाच्या माणसाची भूमिका केली होती। ते फार अवघड होते. आणि, विशेष म्हणजे 'आराधना' करंडक मध्ये ते नावाजलेदेखील गेले.
मी - केदारदा, तुला मी डिरेक्शन करताना पाहिलयं। तुला अभिनयाचे ऍवॉर्ड मिळालेले आहेच. तु एकदोनदा म्युजिक केलेले आहेस आणि आता आर्ट डिरेक्शन? या सर्व क्षेत्रात तु वावरतोयस. पण, यातले तुला सर्वांत जास्त काय आवडते?
केदार - अं, खरं सांगायचं तर डिरेक्शन, कारण त्यात तुमच्या सर्व कल्पनाना वाव मिळतो। त्यामुळे, माझी डिरेक्शनला फर्स्ट प्रायोरीटी असते. त्यानंतर आर्ट डिरेक्शन. कारण, तो माझ्या पेश्याशी रिलेटेड आहे. आणि सर्वात शेवटी, जर कोणीच उपलब्ध नसेल तर ऍक्टिंग.
मीः- बर, आता याच अनुशंगानं आणखी एक प्रश्न? तुला स्वतःला काय करायला आवडते,नाटक का चित्रपट? आणि का?
केदार - खरे सांगायचे तर, दोन्ही माध्यमे आपापल्या जागी योग्य आहेत। पण मला म्हणूनविचारशील तर 200% नाटकच. कारण नाटकात थेट संवाद साधता येतो. महत्त्वाचे म्हणजे स्वतःला Explore करता येते. जज करता येते. चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचतो हे खरं. पण, त्यावेळी दडपण असते आणि महत्त्वाचे म्हणजे बदलाची संधी पण मिळते ती नाटकात. म्हणजे, आपल्याला वाटले की हा संवाद असा घेतला तर जास्त इफेक्टिव ठरेल. पण, चित्रपटात तसे नाही. एकदा शुट झाले की संपले. त्यामुळे जीवंत अनुभव देणारे नाटक हेच चांगलं.
मी - बर आता एक वेगळा प्रश्न, तु आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहेस? याचातुला या क्षेत्रात फायदा होतो का?
केदार - हो। नक्कीच होतो ना.
मी - खरतरं तू पूर्णवेळ कलाकार नाहीस? व्यवसाय, कुटुंब, आणि कला हे सगळं तु कसंमॅनेज करतोस? आणि पुढेमागे पूर्णवेळ कलाकार व्हायचं ठरवलं आहेस का?
अरे, खरतरं तारेवरची कसरत करावी लागते। पण, आवड असली की सवड मिळतेच. हा, पण सॅक्रीफाईज करावे लागते. त्याला पर्याय नाही. आणि भविष्याबाबतीत म्हणटलेस तर अजुन काय ठरवलेले नाही. इथे (कपाळावर) जे लिहिले असेल तसे होईल. पण, जर व्यवसाय व कला अशी निवड करायची झाल्यास व्यवसायच निवडीन. पण, जर चान्स असेल, तशी संधी आली तर कलेबाबत. पण, शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असतोच ना.
मी - बरं आता एक महत्त्वाचा प्रश्न ? यावेळी तुझ्यासह कोल्हापूरच्या एकूण तिघांनी 'झीगौरव' मिळवला, तर एकाने 'फिल्मफेअर' मिळवले। यामुळे, पुणे मुंबई आणि कोल्हापूरसारखी गावे यांमधील दरी कमी होत आहे. असे वाटते का?
केदार- याबाबतीत म्हटलं तर 'हो' आणि म्हटलं तर 'नाही'। कारण मुळात म्हणजे कलेच्या प्रांतात असा भेदभाव करू नयेत. कारण, ते या क्षेत्राला मरक आहे. आणि एखाद्याने काम करायचे ठरवले, तर तो ते मिळवतोच. हा, पण एक गोष्ट आहे. पुर्वी, साधारण महानगरीय भागातील लोकांना पुरस्कार, प्रसिध्दी मिळायची. पण, ते चित्र मात्र आज नक्की बदललयं. पुर्वी, काम मिळवायला मुंबई गाठायला लागायची. मात्र, आता लहानसहान गावातून निर्मिती घडत आहे. याशिवाय 'संजय मोहिते' ने मुंबईत जावून नाव कमावलेच की. त्यामुळे ही दरी कमी होत आहे. आणि, याचे कारण काय आहे माहित आहे का? आपण, आपल्या कोसापुरते मर्यादित राहतो. आपल्याकडची मंडळी आपले प््राश्न मांडतात. तर महानगरातले त्यांचे. आणि, ते प्रश्न एकमेकांना रूचत नाहीत. म्हणून ती दरी निर्माण होते. अरे, आज कोल्हापूरातल्या गुंडागिरीवर बनलेलं 'युज ऍन्ड थ्रो ' इथे यशस्वी ठरतं. पण, मुंबईत मार खातं, कारण तिथं तो प्रश्नच नाही आहे. मग, त्यांना काय कळणार. पण, आजकाल चित्र बदलतयं. लोक एकमेकांना सामावून घ्यायला लागले आहेत. सामान्यांच्या जीवनावर सहज नजर टाकली तरी चित्रपट जमून जातो, हे 'स्लमडॉग' ने दाखवून दिलयं. तो पिक्चर चांगला का वाईट हा भाग अलहिदा! पण, हा बदल घडून आलाय हे महत्वाचं
मी - मग, यात प्रसारमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात का?
केदार - हो नक्कीच, मध्ये आपण चर्चा केली होतीच की यावर। अरे, आजकाल विविधनियतकालीकातून असे चित्र रंगवलं जातयं की रंगभूमी फक्त पुण्या-मुंबईतच. अरे, त्यांचं कार्य मला मान्य आहेच. त्यांनी जे उत्तम रसिक घडवण्याचं काम केलयं त्याला सलाम. पण, आजकाल अशा बेटांच्या स्वरूपात कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, कणकवली यांचे जे उपक्रम चालतात त्याबदद्ल किती लिहिले जाते. गेले 125 वर्षे आपला क्लब या क्षेत्रात उत्तम काम करतोय, त्याची तरी किती दखल घेतली गेली. हा, इथे आपलीही चूक आहेच. आपण कोषातून बाहेरच पडत नाही. आपण, एकदा तरी पुण्या-मुंबईत गेलोय का नाटकं बघायला. त्यामुळे आपण कोषात राहतो, प््रासिध्दी करत नाही. आणि, कोल्हापूरसारख्या गावात अजून प्रेक्षकवर्ग तयार झालेला नाही. यामुळे नाटक मार खाते. पण, हे चित्र बदलणे हे रंगभूमी, चित्रपट याबाबत महत्त्वाचे आहे. नाटक, चित्रपटाबाबत हिच स्थिती आहे. पण, जर का हे चित्र आपण बदलले ना. तर या क्षेत्राला सोनेरी दिवस आहेत हे नक्की.
मी - बरं, आता शेवटचा प्रश्न। पहिल्यांदा मला या क्षेत्रातल्या तुझ्या आवडत्या व्यक्ति (खरेतर हा प्रश्न आधीच विचारायच होता पण तसा प्रसंग न आल्याने आत्ता विचारला)सांग आणि तु आमच्यासारख्या नवोदितांना काय सांगशील, तेदेखील सांग.
केदार - माझे आवडते म्हणशील, तर मला नट म्हणून अमोल पालेकर आवडतात. आणिकलादिग्दर्शक म्हणून नितीन देसाई. नितीन देसाईंचे काम तर उत्तम आहेच. पण, त्यांनी कलादिग्दर्शनाला जे ग्लॅमर मिळवून दिलं आहे. त्या त्यांच्या कामाला तोड नाही. आणि, मी काही उपदेश देण्याइतका मोठा नाही. माझी पण सुरवातच आहे. फक्त, तुमच्यापेक्षा 5-6 पावसाळे जास्त बघीतलेत. म्हणून, आणि एक मित्र म्हणून इतकेच सांगीन की, नाटक करा पहिल्यांदा, ते सिरीअसली करा, स्वतःला शहाणे समजून कुंपणात बांधून घालू नका.आणि शेवटपर्यंत शिकत रहा इतकेच
मी - केदारदादा, पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार.
मी - केदारदादा, पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार.
मुलाखत व श्ब्दांकन-विनायक पाचलग
0 comments:
Post a Comment