रंगभूमीची ही पडझड का झाली याची कारणे सर्वांना अगदी तोंडपाठ आहेत. यावर अनेक चर्चा, वादविवाद झालेले आहेत. पण, दुर्देवाने या प्रश्नावर अजुनही कोणताही ठोस उपाय समोर आलेला नाही., पण,नाटकाचा हा डोलारा सावरायला 'बुडत्याला काडीचा आधार' प्रमाणे वेगवेगळया ठिकाणी असणारे छोटे-मोठे नाटककारांचे समूहच उपयोगी पडतील,यात काही शंका नाही. आणि, नाटकाची ऊर्मी, व्यक्त व्हायची इच्छा त्यांच्याकडे असल्याने ते यात सहाय्य करतील यातदेखील शंका नाही मग, प्रश्न पडतो की, अशा वेगवेगळया बेटांच्या रूपात असणाऱ्या या संस्थांच करायचे काय?
पण, हा विचार करताना पहिल्यांदा आपण या बेटांबद्दल जाणून तरी घेतलं पाहिजे. खरंतर, महाराष्ट्राचा आत्मा नाटक आहे असे म्हणायला हरकत नाही त्यामुळे महाराष्ट्रात गावोगावी छोट्या,मोठया प्रमाणात ''नाटकवाली मंडळी'' होताल. यातीलच काही मंडळे आजही टिकून आहेत. सातत्याने नाटके करत आहेत तीच ही बेटे. बाबा वर्दम थीएटर,कोल्हापूरचे देवल क्लब ,कणकवलीचे ''नाथ पै'' फाऊंडेशन, नाशिक,सांगली,सातारा इथे असणारे अभिरुची,प्रत्यय सारखे विविध ग्रुप्स ही त्यातली काही प्रमुख बेटे, पण दुर्देव म्हणजे हया संस्था आजवर फारशा प्रकाशात आल्याच नाहीत. खेदाची बाब अशी की, विविध माध्यमांनी नाटकाबद्दल चर्चा करताना नाटक म्हणजे फक्त मुंबई-पुण्यातीलच असा गोड गैरसमज करून घेतला. अगोदर, नाटकावर लिहिणारे हातावर मोजण्याइतपतच लोक आहेत. मात्र, त्यांचा रोख फक्त मुंबई-पुण्यावर केंद्रित असतो. यामुळे, नकळत का होईना, मराठी नाटकाचे सरळ दोन भाग पडले असे म्हणायला हरकत नाही. मला काय सर्वांनाच हे मान्य आहे की, त्या संस्थांनी जे काम केलय, करत आहेत त्याला काहीही तोड नाही. त्याबद्दल माध्यमांनी जरूर लिहावे. पण, बाकीच्यानींही आपापल्या परिसरात हे काम कमी - अधिक प्रमाणात का होईना केले आहेच ना?
देवल क्लब १००हून जास्त वर्ष सतत नाटयक्षेत्रात आहे. अनेक कलाकारांची मोठी फौज या क्लबने दिली आहे. तिकडे विदर्भात जयकुमार तांगडे आपल्या नाटकातून हिरीरीने तिथल्या समस्या मांडत आहे. अगदी गोव्यातून काही संस्था येऊन ''नागानंद''सारखी ऐतिहासिक नाटके लोकांपुढे मांडत आहेत. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान गेले २५ वर्षे सलग एकांकिका स्पर्धा भरवत आहे आणि गेले १०-१५ वर्षे नाट्य महोत्सव भरवत आहेत, आज जी काही प्रायोगीक नाटके चालु आहेत जवळजवळ त्या सर्वांचे प्रयोग तेथे झालेले आहेत. कणकवली झालेला २-२½ महिन्याच्या वर्कशॉपमधून ''मी माझ्याशी'' हा नितांत सुंदर प्रयोग घडला आहे, हे कितीजणंना माहित आहे. मध्यंतरी ''मी माझ्याशी'' वर माध्यमांत थोडीफार चर्चा झाली. पण, त्याअगोदर जवळ जवळ ४ ते ५ महिने त्याचे प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात चालू होते, त्यावेळी त्याची दखल का घेतली गेली नाही? आपले नाटक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण मुंबई-पुण्यातच आले पाहिजे, असा एक चुकीचा पायंडा यानिमित्ताने पडण्याची शक्यता आहे. वर उल्लेखलेल्या नाट्य महोत्सवाचे तर नसिरुद्देन शहानीदेखील कोउतुक केले आहे,पण त्यांचा उल्लेख माध्यमातुन का होत नाही? शरद भुताडियानी तर आईन्स्टाईनचा प्रयोग सातासमुद्रापार नेला त्याला माध्यमात किती प्रसिद्धे मिळाली होती.
बर! या संस्था आपल्या भागातून ,कोषातून बाहेर येत नाहीत, असेही नाही। देवलचा 'अंधारात मठठ' असो वा आत्ताचे ''मी माझ्याशी''असो. यांनी स्वखर्चाने जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. पण, असे प्रयोग माध्यमांनी उचलून धरणे गरजेचे आहे. याशिवाय चाळीसगाव सारख्या भागात जिथे धड नाटयगृह नाही. तेथे उत्तम नाटके बनत आहेत, ते कसे बाहेर येऊ शकणार. त्यामुळे, माध्यामांनीच या बेटांना एकत्र आणायची गरज आहे.हा त्यांच्या सामाजीक उत्तरदायित्वाचा भाग आहे असे म्हणायला हरकत नाही.
थोडक्यात काय, तर नाटयसृष्टी वाचविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे। विशेष गोष्ट म्हणजे यादृष्टीने यातल्याच काही संस्थांनी ही दरी बुजवायचा, नाटकाला हातभार लावायचा प्रयत्न केला आहे. बरीचशी नाटके कोल्हापूरसारख्या भागात 'बुकींग नाही' च्या नावाखाली यायला कचरतात. मात्र, मध्यंतरी कोल्हापूरात देवल क्लबनेच ''जाता नाही जात'', 'आदिपश्य'',"तु" सारख्या नाटकांचे प्रयोग घडवुन आणले होते,त्यासाठी सहकार्य केले होते. नव्या पिढीतुन सुजाण प्रेक्षकवर्ग निर्माण होण्यास वेळ लागणार आहे हे नक्की. पण, त्यासाठी असे प्रयत्न सतत चालू राहणे गरजेचे आहे. एक गोष्ट हातच्या कंकणाइतकी स्पष्ट आहे की, नाटकाला वाचवायला सर्वात महत्वाची भूमिका ही माध्यमांचीच असणार आहे. कारण, जरी प्रेक्षक आणि उत्तम नाटके यांचे प्रमाण कमी झालेले असले तरी ती पूर्ण संपलेली नाहीत. पण, ती प्रेक्षकापर्यंत पोहोचत नाही आहेत. ही दरी मिटविण्याची मोठी भूमिका माध्यमांना बजावायला लागणार आहे.कदाचीत जर माध्यमे त्यांच्यापर्यंत पोहोचणार नसतील तर रंगकर्मीना त्यांच्याकडे जावे लागेल्,पण माध्यमानी ही भुमिका आनंदाने निभावावी अशी सर्वांचीच इच्छा आहे,विशेषतः स्थानीक माध्यमानी नाटकासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विशेषत: नाटकाबद्दल बरी वाईट चर्चा घडवून आणणे हे गरजेचे आहे. या छोटया-मोठया बेटांची एक चूक मान्य करायलाच हवी की बर्याचदा ते स्पर्धेसाठी नाटके बनवतात. त्यामुळेसुध्दा नाटके मागे राहतात. अशा चर्चा त्यांना त्यांची क्षितिजे विस्तारण्यास मदत करतील. एकमेकांच्या सहकार्याने आपापली नाटके, वेगवेगळया गावी पोहाचविणे, त्यांचे प्रयोग करणे हयासारख्या गोष्टींनी या बेटांना एकत्र आणता येईल.सतीश आळेकरानी असे प्रयोग केले होते पण त्यात सातत्य नाही,अशा प्रयोगांचा पुर्वानुभव लक्षात घेवुन पुर्वीच्या चुका टाळत विविध नाट्यसंस्थानी हा उपक्रम हाती घेतला पाहिजे. इथे कौतुक करावे वाटते ते ''सांगली'' च्या चैतन्य संस्थेचे. या संस्थेने आणलेल्या योजनांमुळे थोडीफार का होईना पण नाटक छोटया शहरात पोहोचू लागली आहेत. जाणकार प्रेक्षकांची निर्मिती होऊ लागली आहे. ''प्रेक्षक'' हा आपला मायबाप आहे. त्यामुळे आपण त्याची मर्जी सांभाळणे व त्यायोगाने नाटयसृष्टी वाढविणे हे आपले काम आहे. आपण रंगकर्मी, माध्यमे याबाबत काय करू शकतात. याबाबत विचार केला. ते तर आपण केले पाहिजेच.पण, या सर्वापेक्षा महत्वाची भूमिका बजावू शकते ते शासन.
महाराष्ट्र शासनाने अनुदानाच्या माध्यमातून नाटकाला मदत करायला सुरूवात केली आहे। पण, ही एककल्ली मदत आहे. आणि, त्याचा गैरफायदाही घेतला जात आहे. शासनाचे सांस्कृतीक धोरण अजुन अस्तित्वात नाही,त्यामुळे योग्य अंमलबजावणी होत नाही आहे. याशिवाय,शासनाने छोटया गावातील रंगकर्मींना मदत करायला काय हरकत आहे? ते भविष्यात खुप फायद्याचे आहे. आज अनेक कलाकार नाटकावरच्या प्रेमापोटी विविध विद्यापिठाच्या नाटयशाखा विभागात कार्यरत आहेत. त्यांना सरकारी मदत देऊ केल्यास व माध्यमांनी ग्लॅमर दिल्यास ते नाटकाचे फिल्ड का सोडतील. शासनाच्या सहयोगाने विविध कार्यशाळा, परिसंवाद, नाटय-महोत्सव यांचे आयोजन झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होवू शकतो. कोल्हापूरचा ''आय एफ एफ'' ने ते सिध्द केले आहे.असे महोत्सव International Foundation of Arts ने केले होतेच की,मग शासनाने करायला काय हरकत आहे
थोडक्यात इतकेच की, नाटक ही समाजाची अभिव्यक्ती आहे. ती वाचविणे गरजेचे आहे. आणि आत्ताच्या घडीला ती वाचविण्यासाठी अशी रंगकर्मींची बेटे हे सर्वात महत्वाचे साधन आहे. शासन, प्रसारमाध्यमे आणि रंगकर्मी यांनी विचारपूर्वक कृती केल्यास ,नाटकाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्यास आणि सर्व समावेशक धोरण आखल्यास नाटकाला पुन्हा सोनेरी दिवस यायला वेळ लागणार नाही. गरज आहे ती फक्त कृतीची आणि हो, एक मराठी प्रेक्षक आणि रंगकर्मी म्हणून तो दिवस बघण्याची , त्यासाठी प्रयत्न करण्याचीमाझी आणि सर्व रंगकर्मींची आणि माझी मनापासून इच्छा आहे.
विनायक पाचलग
0 comments:
Post a Comment