सूचना - हे नाटक, त्यातील पात्र आणि घटना पूर्णपणे लेखकाच्या मनाचे श्लोक आहेत. ह्यातील पात्रांशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती कुठेही आढळल्यास तो योगायोग समजावा आणि त्यांच्यापासून कटाक्षाने दूर रहावे.
पात्र - नवरा, फोटोतून बोलणारी स्वर्गवासी बायको, मुलगी, ज्योतीशी पिता पुत्र.
----------------------------------------------------------------------------------------------
मी वैकुंठवासी राजाराम गणपत आपटे ह्यांची कैलासवासी पत्नी जगदंबा राजाराम आपटे. म्हणजे, आमचे हे अजून जिवंत आहेत, पण आमच्या बंगल्याचं नाव वैकुंठ असल्याने मी त्यांना प्रेमाने वैकुंठवासी म्हणते. आमचं लग्न चारचौघांसारखं बघण्याचा कार्यक्रम करून, पत्रिका जुळवून झालं. ह्यांचं घराणं पहिल्यापासून श्रीमंत. घरी गडगंज संपत्ती पण मुलगा एकच. लग्न मोठ्या धूमधडाक्यात झालं. गावजेवण घातलं होतं त्या दिवशी. एकुलते एक असल्याने हे अतिशय लाडावलेले होते. खरं सांगायचं तर आमचे हे म्हणजे लग्नाआधी एकदम बावळट्ट ध्यान होते. कसली म्हणून काळजी घ्यायची नाही, जरा म्हणून चटपटीतपणा नाही. पूर्वी आई जशी कामं करायची तशी आता बायको करणार ह्या भ्रामक समजुतीत हे सुरुवातीचे काही दिवस होते. पण हळू हळू मी त्यांना सुधरवायला सुरुवात केली. काही वर्षातच सुतासारखे सरळ झाले असते, पण दुर्दैवाने पहिल्याच बाळंतपणात मला देवाज्ञा झाली... आणि... ह्यांनी सोडलेली सिगारेट पुन्हा सुरू केली.
मुलीला सांभाळताना ह्यांची होणारी कसरत मी फोटोतून बघत होते. कार्टी पण इतकी वाह्यात की बापाला सळो की पळो करून सोडायची. पण एक मात्र आहे की ह्यांनी माझ्यानंतर दुसरं लग्न केलं नाही.
अरे अरे अरे अरे... काय पसारा करून ठेवलाय सगळीकडे..., आज चांगलंच फैलावर घेणार आहे ह्यांना.
(बापाची एंट्री होते. )
बायको- या... झालं का गाव उंडारून?
नवरा- घ्या, झाली कटकट सुरू... अगं तू आता आमच्यात नाहियेस बये... आता तरी त्रास देणं सोड मला...
बायको- अहो... हा काय घराचा उकिरडा करून ठेवलाय???
नवरा- गडी रजेवर आहे माहिती आहे ना तुला?
बायको- तुम्हाला हात दिलेत ना दैवाने? पत्ते कुटण्याशिवाय हातांनी अजूनही कामं करता येतात... मी होते तेव्हा कशी हो सगळी कामं करायचात गुपचुप?
नवरा- बाहेर गाड्यांचे भोंगे आणि आत हा भोंगा. कानाची भोकं होणारेत माझ्या...
बायको- तुमच्या कानाची तशीही भोकंच आहेत... तुम्हाला हजार वेळा सांगितलं आहे की बाहेर पडताना सगळे दिवे मालवू नका म्हणून, मला अंधारात एकटीला भीती वाटते.
नवरा- पहिली गोष्ट म्हणजे तुला... चक्क तुला एखाद्या गोष्टीची भीती वाटते ह्यावर माझा विश्वास नाही. तू घाबरणं म्हणजे जास्वंदाच्या फुलाला वास येणं, दाउदने सत्यनारायण घालणं आणि राजकारण्यांनी आश्वासनं पाळण्याइतकी अशक्य गोष्ट आहे. दुसरं म्हणजे विजेचं बिल माझं सासरा भरत नाही.
बायको- बाबांवर जायची काहीही गरज नाहीये. इतकी सुंदर, सुशील बायको मिळाली तुम्हाला... जरा म्हणून कौतुक नाही बायकोचं...
नवरा- कौतुक नाही?
बायको- हो नाही
नवरा- काय कमी करतो गं तुझं मी?
बायको- आधी माझं काय करता ते सांगा, कमी जास्त नंतर बघू
नवरा - रोज तुझा फोटो स्वच्छ करतो
बायको- गडी करतो
नवरा- रोज फोटोला हार घालतो
बायको- गडी घालतो
नवरा- दर सहा महिन्यांनी तुझ्या फोटोची फ्रेम बदलतो... लग्नाआधी साड्यांनी वीट आणला, आता फ्रेम मुळे वैताग येतोय. काठावरती मोराचं डिझाइन असलेली फ्रेम मिळत नाही गं जगात कुठेही...
बायको- फोटो फ्रेम पण गडीच बदलतो. काय ते मेलं कळकट दुकान... एकदा तर मेल्याने माझ्या फ्रेम मध्ये दुसर्याच कुणाच्या बायकोचा फोटो घालून तुम्हाला दिला
नवरा- हो ना
बायको- आणि तुम्हीही तो सरळ अडकवलात भिंतीवर, जरा म्हणून लाज नाही...
नवरा- अगं आधी माझ्या लक्षातच आलं नाही...
बायको- हेच तुमचं लक्ष बायकोकडे...
नवरा- पण ३-४ दिवस घर बरंच शांत-शांत वाटल्यावर लक्षात आलं... पण फोटोतली बाई दिसायला बर्यापैकी होती म्हणून ठेवला फोटो... तू काय, माझ्या मनात आहेसच गं...
बायको- २ दिवस त्या घाणेरड्या फडताळात पडून राहावं लागलं होतं... कसला तो मेला कुबट्ट वास. आणि मेल्याने बिपाशा बासू, सच्छींद्र महाराज आणि मी असं तिघांना एकावर एक ठेवलं होतं...
नवरा- हा हा हा हा.... बिचारे सच्छींद्र महाराज
बायको- अहो... एक गोष्ट बरेच दिवस मनात होती, विचारू का?
नवरा- माझी परवानगी मागतेयस? लग्नानंतर माझी सिगरेटची पाकिटं चुलीत टाकताना मागितली होतीस परवानगी? आईच्या साड्या परस्पर बोहारणीला देताना मागितली होतीस परवानगी? माझ्या सगळ्या दारूच्या बाटल्यांमध्ये चहाचं पाणी भरून ठेवताना मागितली होतीस परवानगी?
बायको- तेव्हाची गोष्ट वेगळी होती...
नवरा- काय वेगळी होती???
बायको- अहो तेव्हा मी जिवंत होते, माझं तुमच्यावाचून काही अडत नव्हतं... आता मेलं साधं फोटो पुसायचा म्हटलं तरी स्वत:चं स्वतः करता येत नाही... बरं ऐका...
नवरा- ऐकवा...
बायको- मी गेल्यावर तुम्ही दुसरं लग्न का नाही केलंत हो? खरं खरं सांगा हां... मनातलं अजिबात राखून ठेवू नका...
नवरा- खरं सांगू...
बायको- हो...
नवरा- आपलं लग्न झालं, सुरुवातीचे काही दिवस फार मजेत गेले... पण नंतर...
बायको- नंतर काय?
नवरा- नंतर... नंतर तुझ्या बापसाला तुझं लग्न उरकून टाकायची घाई का झाली होती ते मला कळलं...
बायको- काय?????????
नवरा- लग्नाच्यावेळी माझ्याकडे बघून जे डेंजर हसलाय तो, तेव्हाच मनात शंका आली होती... तुला माझ्या हवाली करून त्याने स्वत:ची सुटका करून घेतली...
बायको- तोंडाला येईल ते बोलू नका... पाठवणीच्या वेळी बाबा मला मिठी मारून किती रडले... पाहिलं नाहीत का?
नवरा- पाहिलं ना... नंतर त्यांनी मलाही मिठी मारली... आणि रडत रडत माझ्या कानात काय म्हणाले माहिती आहे?
बायको- काय?
नवरा- खो...
बायको- काय?
नवरा- अग खो... म्हणजे खो दिला त्यांनी मला. म्हणाले आता रडण्याची तुझी पाळी...
बायको- काहीही फेकू नका...
नवरा- विश्वास नसेल बसत तर विचार बापालाच तुझ्या...
बायको- बाबा असं म्हणणं शक्यच नाही...
नवरा- जाऊ दे झालं ते झालं... तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तू माझा ४ वर्ष जो अनन्वित छळ केलास त्याला घाबरून मी दुसरं लग्न केलं नाही...
बायको- मी काय छळ केला हो तुमचा... सासू बाईंनीच लाडावून ठेवलं होतं तुम्हाला... माझा बाब्या माझा बाब्या करून डोक्यावर चढवून ठेवलं होतं...
नवरा- साफ खोटं आहे हे...
बायको- लग्नापूर्वी तुम्हाला साधा चहा तरी करता येत होता का?
नवरा- आपल्या घरात फार पूर्वी पासून गडी माणसं आहेत, मला काय गरज काही शिकायची???
बायको- ते काही असो, माणसाला यायलाच हवं. मी तुम्हाला स्वावलंबी बनवलं... एक कप चहा करायला किती कप पाणी ठेवायचं हे ही माहिती नव्हतं. उण्यापुर्या २ वर्षात तुम्हाला स्वयंपाक-पाणी, धुणी-भांडी ह्यात तरबेज केलं मी त्याबद्दल आभार मानायचे सोडून मलाच नावं ठेवताय... काय मेली पुरुषाची जात...
नवरा- तुझ्या बापानी पुढाकार घेऊन आपलं लग्न ठरवलं म्हणून मी कायम त्यांचा राग केला, पण एका गोष्टीसाठी मात्र मी त्यांना पूर्ण मार्क देतो...
बायको- कोणती हो?
नवरा- तुझं नाव कसलं फर्स्टक्लास ठेवलंय... जगदंबा... अगदी शोभून दिसतं हो तुला... एक गंमत माहिती आहे का तुला?
बायको- काय?
नवरा- जगातली तू एकमेव व्यक्ती आहेस जी "मी माझ्या नावाला जागले" असा दावा करू शकते...
बायको- हे अती होतंय... तुम्हाला एकदा चांगली अद्दल घडवणार आहे... एकदा मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली की आहातच तुम्ही आणि तुमचा समाचार घ्यायला मी...
नवरा- बापरे, हे लक्षातच आलं नाही माझ्या...
बायको- माहिती होतं तुमच्या लक्षात येणार नाही ते, उगाच नाही तुम्हाला ध्यान म्हणत मी... तुमचं सोडा आता, पमी कुठाय हो???
नवरा- कुठे तरी बाहेर गेलेय, येईलच इतक्यात...
बायको- कुठे गेली आहे ती?
नवरा- ती सांगून जाते का? कार्टी पार हाताबाहेर गेली आहे... जरा म्हणून बापाला धूप घालत नाही. आईचा नेमका तो एक गुण उचललाय...
बायको- माझ्यावर कसची जातेय, लहानपणापासून तुम्हीच वाढवलंय ना तिला...
नवरा- पण नऊ महिने तुझ्या पोटातून बापावर चाललेले अत्याचार ऐकत होती ना ती...
बायको- तुमची वायफळ बडबड झाली असेल तर आता आपण आपल्या मुलीविषयी बोलूया का?
नवरा- हो हो
बायको- मी काय म्हणते... बास झालं आता... पोरगी घोडनवरी व्हायच्या आत तिचं लग्न उरकून टाका...
नवरा- हो गं. किती वेळा सांगितलं तिला, पण ऐकेल तर शपथ...
बायको- अहो तेविसावं लागेल यंदा तिला... मी तिच्या वयाची असताना मला ती झाली होती...
(बाहेरून जोरात हाक ऐकू येते)
डॅडी........
(मुलगी बॅग नाचवत आत येते)
पमी - हाय डॅड
नवरा- बाबा बोल...
पमी - हाय बाबा...
नवरा- कार्टे थोडी सुधार, जरा मुली सारखी वाग आता. बापाला नमस्कार करायचा सोडून हाय करतेस? तुझ्या अशा वागण्याने एक दिवस मीच हाय खाईन...
पमी - काही तरी बोलू नका हो बाबा... अजून थोडी वर्ष थांबा...
नवरा- असं म्हणतेस???? बरं थांबतो बुवा, मला तरी दुसरं काय काम आहे... नाहीतरी वर जाऊन पुन्हा तुझ्या आईच्या तावडीत सापडण्यापेक्षा हे बरंच बरं आहे...
बायको- काय गं घोडे, ह्या काय झिंज्या वाढवून ठेवल्यास?
नवरा- अगं तुझा आवाज तिला ऐकू येत नाही... ती शिक्षा मला एकट्यालाच आहे...
बायको- अहो... बघताय काय शुंभा सारखे... तेल लावून चांगली चापून चोपून वेणी घाला बघू तिची...
नवरा- असू दे गं...
पमी - कुणाशी बोलताय बाबा???
नवरा- स्वतःशीच बोलतोय गं... (फोटोकडे हात दाखवून) माणसाला वात झाला की होतं असं कधी कधी... तू कुठे गेली होतीस?
पमी -आपली कुंदा आहे ना...
नवरा- कोण कुंदा
बायको- अहो भिड्यांची मुलगी, अगदीच कसे हो वेंधळे तुम्ही... काही म्हणून काही लक्षात राहत नाही...
नवरा- हांहां... आठवलं आठवलं... तिची आई मिसेस कर्वे नगर स्पर्धेत पहिली आली होती तीच काही भिडे?
बायको- हे बरोबर लक्षात राहिलं तुमच्या...
पमी - यस्स... तीच ती कुंदा भिडे...
नवरा- काय झालं तिला?
पमी - तिला कुठे काय झालंय?
नवरा- अगं मग तिचं नाव का घेतलंस?
पमी - सांगते... तर मी आणि कुंदा आज तिच्यासाठी खरेदी करायला गेलो होतो तुळशी बागेत...
नवरा- बापरे...
पमी - बापरे काय त्याच्यात?
नवरा- अगं तुळशी बाग नावाचा तो एक असा चक्रव्यूह आहे की जिथे गेलेला माणूस परत कधी बाहेरच येत नाही...
पमी - काहीही काय हो...
नवरा- अगं हो... कित्येक नवर्यांच्या बायका पिशवी घेऊन आत शिरतात त्या आठवडेच्या आठवडे परतच येत नाहीत...
पमी - तुमचं आपलं अतीच असतं... हां थोडी गर्दी असते तिथे, पण ठीक आहे...
नवरा- बरं झालं तू आपली निघून आलीस ते...
पमी - तुम्ही काय केलंत बाबा सकाळ पासून? म्हणजे मॉर्निंग वॉक, त्या नंतर जय भारत मधला चहा प्लस कालचा पेपर (बायको: प्लस ह्यांची धुरांडी) वाचून घरी आल्यावर काय केलंत?
नवरा- आम्ही असा विचार करत होतो की...
पमी - आम्ही कोण?
नवरा- आम्ही म्हणजे मीच गं... आदरार्थी एकवचन म्हणतात त्याला. बरं, विषयांतर नको... तर, मी असा विचार करत होतो की...
पमी - की मी आता २ महिन्यात तेवीस वर्षाची होईन, माझं लग्नाचं वय उलटून चाललंय, आई माझ्या एव्हढी असताना तिला मी झाले होते त्यामुळे आता माझं लवकरात लवकर लग्न करायला हवं...
नवरा- बरोब्बर. मग कधी करायची सुरुवात मुलं बघायला?
पमी - करू हो बाबा, कसली घाई आहे?
बायको- त्या घोडीला म्हणावं तिला नसली तरी आम्हाला घाई आहे...
पमी - (आईच्या फोटोकडे बघत) आज आई असती तर तिने अजून ४-५ वर्ष तरी मला लग्न होऊन जाऊ दिलं नसतं...
बायको- मुस्काट फोडीन... शी: ह्या फोटो फ्रेम मध्ये गेल्यापासून मेलं काही म्हणजे काही करता येत नाही मला... अहो, धपाटा घाला बघू तिला एक.
नवरा- म्हणजे तशी तू मला जड झाली नाहियेस... पण तुझं लग्नाचं वय झालंय बाळा. आता उगाच थांबण्यात काय अर्थ आहे...
बायको- अहो असे मुळमुळीतपणे बोलू नका. चांगलं खडसावून सांगा... ३ महिन्यात लग्न आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
नवरा- ३ महिन्यात लग्न आणि १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी+ बायको - काय???
नवरा- ३ महिन्यात लग्न आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी - बाबा मला एक सांगा, तुम्ही लग्न केलं?
नवरा- हो केलं...
पमी - तुम्हाला लग्न करून काय मिळालं?
नवरा- काय मिळणार?
पमी - शाळेतल्या बाईंसारखी वागणारी एक बायको आणि माझ्यासारखी एक भन्नाट मुलगी...
नवरा - ह्म्म्म्म्म...
पमी - मी ही ह्याच सगळ्यातून जावं असं खरंच तुम्हाला वाटतं का?
नवरा- नाही...
पमी - नाही ना? मग का माझ्या लग्नाच्या मागे लागले आहात???
नवरा- कारण अशी बायको मिळायला तू मुलगा नाहियेस आणि मुलीचं लग्न २४ वर्षाच्या आत झालंच पाहिजे अशी आपल्या घराण्याची रीत आहे...
पमी - बाबा मी आयुष्यभर लग्न न करता रहायचं ठरवलंय...
नवरा- कार्टे... काहीही काय बोलतेस???
बायको- अहो कानाखाली वाजवा तिच्या आत्ताच्या आत्ता...
पमी - गंमत करतेय हो... द्या टाळी...
नवरा- अगं तुझ्या जिभेला काही हाड??? प्रत्यक्ष बापाची चेष्टा करतेस???
पमी - चेष्टा नाही हो बाबा, थोडी गंमत...
नवरा- तुझी गंमत जंमत झाली असेल तर आपण विषयाकडे वळूया का?
पमी - बोला...
नवरा- बोला काय? मी सत्यनारायणाची पूजा सांगतोय का? नीट लक्ष देऊन ऐक, येत्या तीन महिन्यात काहीही करून तुझं लग्न झालंच पाहिजे...
बायको- आणि नंतर १० महिन्यात पाळणा हललाच पाहिजे...
पमी - पण बाबा...
नवरा- पण बीण काही नाही...
पमी - ऐका तर माझं... अहो अजून मला किती तरी गोष्टी करायच्यात, कुठे कुठे फिरायचंय, बरंच काही काही बघायचंय...
नवरा- बघायचंय ना? मग मुलं बघ... वाटल्यास बरीच बघ... पण उद्यापासून तुझ्यासाठी वरसंशोधन सुरू
बायको- शाब्बास रे नवरया...इतक्या वर्षात पहिल्यांदाच माझ्या नवर्याला शोभेलंसं बोललास...
नवरा- गप्प बस माझे आई...
बायको- आता तुम्ही खुशाल माझ्या बाजूला लटका, मला जराही अपमान वाटणार नाही...
नवरा- मी उद्यापासूनच सुरुवात करतो... उद्याच गुरुजींकडे जाऊन पत्रिका टाकून येतो...
बायको- ऍहॅरे... आले मोठे पत्रिका टाकणारे... पत्रिका बनवली आहे का आधी... कानी कपाळी ओरडून सांगत होते तेव्हा ऐकलं नाही...
नवरा- अरे हो... पण आपण तुझी पत्रिकाच बनवली नाहीये... ठरलं तर, उद्या पत्रिका बनवण्यापासूनच सुरुवात करावी...
पमी - डॅड...
नवरा- काय गं?
पमी - बेस्ट ऑफ लक
(बाप कपाळावर हात मारून घेतो. ब्लॅक आऊट)
क्रमशः
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही एकांकिका सादर करण्यासाठी लेखकाची पुर्वपरवानगी आवश्यक आहे .त्यासाठी व्यवस्थापानाशी संपर्क साधावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment