------------------------------------------------------------------------------
माणसाचं वैशिष्ट काय आहे बरं? बुध्दी ??असेलही, पण, सर्व प्राणीमात्रांना ती कमी-अधिक आहेच की! मग काय असेल ? माझ्या मते 'मन' हे आपले खरे वैशिष्टय आहे. आपल्याला भावना आहेत. कोणी टोचून बोललं तर आपण दु:खावतो, एखाद्या प्रसंगाने आपण आपण आनंदतो. आपणचं काय, आपल्या आजुबाजुच्या कोणाला काही झालं, तरी आपल्यावर त्याचे परिणाम होतात. ही सगळी कशाची किमया? मनाचीच ना! म्हणूनच आपण, या मनाला चार फुरसतीचे क्षण मिळावे, त्याला समाधान लाभावे म्हणून एक विश्व उभं केलं, मनोरंजन विश्व! हे विश्व इतकं फोफावलं, की त्यावर आज हजारो जणांच जगणं चाललय. अन्न, वस्त्र व निवारा या प्रमाणे मनोरंजन ही एक मूलभुत गरज बनुन गेली.
पण नक्की काय चाललय आज या मनोरंजनाच्या नावाखाली? चित्रपट, नाटक, दुरदर्शन ही मनोरंजनाची मुख्य माध्यमे! पण, आपल्या सर्वात जवळचं आणि अतिपरियचयाचं म्हणजे दूरदर्शन! यावर आपण अनेक मालिका बघतो, पण, त्या का बघतो याची चारं कारण देता येतील का आपल्याला? आजकाल विविध वाहिन्यावर ''खतरो के खिलाडी'', ''स्पॅटजविला'' सारखे कार्यक्रम लागतात. त्यात जे प्रकार चालतात ते भयानक असतात. चार दमडयांसाठी ,प्रसिध्दीसाठी काही तरूणांनी पालींमध्ये -सापांमध्ये उभे राहणे, पटते तुम्हाला? तसे नुसते पाहून संवेदनशील मनाला त्रास होतो. पण आजची तरूण पिढी हे कार्यक्रम आवडीने बघते. सेलिब्रिटीज असे स्टंट करताना पाहून त्यांना काहीच वाटत नाही. उलट त्याची चवीने चर्चा केली जाते. यामुळे, आपली पुढची पिढी भावनाशुन्य तर होत नाही आहे ना?
हे झाले तरूणांचे, पण आजकाल घरातले सर्व जण ''इस जंगल मे'' ''बिग बॉस'' सारखे कार्यक्रम आवडीने बघतात, इतरांच्या जीवनात चाललेले खेळ बघून आपण आनंदतो. पण, स्वत:ला एक प्रश्न विचारा? काय, आपल्याला हे सगळे करायला जमेल? केवळ आपल्या आनंदासाठी दर वेळेला १५ लोकांना बरेच दिवस ''समाज'' या मूलभूत गरजेपासुन दूर ठेवायचे. आणि मग बिग बॉस मध्ये त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला की हसायचे, ही विकृती नाही का?
सहानुभूती ही चीजच आपले मन विसरला आहे की काय? कोणा एक नटीशी लग्न करायचं म्हणून दहा - बारा तरूणांनी तिच्याबरोबर रहायचं, तिला मनवण्यासाठी कोणतेही प्रकार करायचे. आज स्त्रीला पटवायला पुरूष जात आहेत, ही नक्कीच बदलाची नांदी आहे,पण त्यात जे प्रकार केले गेले. ते पाहून आजच्या पिढीत स्वाभिमान आहे की नाही तेच कळेनासे झाले आहे. आता तर आपलं पोटच पोरं टी.व्ही.वरच्या कार्यक्रमासाठी दुसर्याला सांभाळायला द्यायचं... छे! हद्द झाली. .! स्त्री मनाचा एक अविभाज्य कंगोरा म्हणजे माया! पण तीलाच तिलांजली देऊन त्यावर जाहिरातींच्या रूपातून करोडोंचं साम्राज्य उभारायचं? एकदा शांतपणे विचार करा? तुमच्यातला मातेला, पित्याला हे पटेल का? गेले काही दिवस विविध वृत्तवाहिन्यावर ''सच का सामना'' वरून रण पेटलं आहे. वृत्तवाहिन्या, शशी थरूरने ट्विटरवर लिहावे का? ''सच का सामना'' चे काय? अशा गोष्टीवर तास-तास चर्चासत्र ठेऊ शकतात. पण, त्यांना शेतक-यांच्या आत्महत्येवर दाखवायला दहा मिनीटांच फुटेज का मिळत नाही? हा जरी चर्चेचा वेगळा विषय असला तरीही ''सच का सामना'' तुम्हाला रूचतय का? बातम्यात आपण हजारदा त्याचे फुटेज बघितले. पण, एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात आपण किती ढवळाढवळ करावी? तो अँकर म्हणतो की समाजाला सत्य स्विकारण्याची सवय झाली! पण बाबा रे, मला एक सांग, तु यातल बक्षिस काढून टाकलस, तर किती लोक खरं बोलतील? आणि, त्यांची ''कन्फेशन्स'' त्यांच्यापुरतीच असुदे ना. जगाने ती का पाहावीत? आणि त्यामुळे जे वाईट परिणाम होतात त्याचे काय?दोन चार जीव गेले त्या मालिकेमुळे त्याची भरपाई देणार आहे का ती वाहिनी? मालिकांबाबत तर न बोलणेच बरे, प्रादेशिक ते राष्ट्रीय .सगळीकडेतीच कथा. एका पुरूषाला तीन-तीन बायका! तरी त्यातली एक पतिव्रता! वा पट्टे हो वा ! मान गये आपको!
हा तर आता तुम्ही म्हणाल की, ''एवढे सगळं का लिहीलस रे बाबा!'' हो, बरोबर आहे. मला या मालिकाविषयी राग नाही.आणि वैयक्तीक आकस तर नाहीच नाही. आणि, नेहमीसारखे त्यांना फक्त शिव्याही घालायच्या नाहीत. पण, मला सगळयांनाच एक प्रश्न विचारायचा आहे. मनोरंजन म्हणजे काय? आत्ता जे चालू आहे त्याला मनोरंजन म्हणायचे का? मनोरंजनाचे एक मूळ तत्व म्हणजे मनाचे समाधान होणे, हे आहे असे मला वाटते पण, यापैकी किती मालिका बघुन तुम्हाला असे समाधान वाटते? यातल्या किती मालिका संस्कारक्षम गेला बाजार विचारप्रवर्तक आहेत. यापैकी एकतरी मालिका आपल्या मनाचा ठाव घेते का? उदा. द्यायचे झाले तर पूर्वीच्या काळी ज्या मालिका आल्या मग ती ''गोटया'' असो, ''हम पाँच'' असो, ''सर्कस'' असो वा ''अवंतिका'' या सर्व मालिका आपल्या जीवनावर आधारित होत्या, त्यात आपली वाटणारी पात्रे होती. त्यांच्या भावनांशी आपण समरूप होऊन जायचो. त्यांच्या हसण्याने आपण हसायचो, तर त्यांच्या दु:खाने आपण दु:खी व्हायचो. पण, आज तसे घडते का? आज सगळे कृत्रिम आणि बटबटीत झाले आहे. त्यातली नैसर्गिकता हरवली आहे. म्हणजे, आजच्या मनोरंजनातुन मनच हरवलयं. उरलय, ते फक्त मनोरंजन.आणि प्रश्न म्हणजे हे आपल्याला चालेल का?
या सर्वात तारक मेहता का उल्टा चष्मा, कुलवधू अशा काही मोजक्या मालिका उरल्या आहेत. ज्या आपल्या जवळच्या नैसर्गिक वाटतात. पण, हे फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहे. मानवी मनाचे इतके कंगोरे आहेत? पण, त्यावर मालिका का बनत नाहीत ?आजच्या मनोरंजनामध्ये मानवी मनासाठी, मनाबद्दल काही नाहीच आहे का?या दोन मालिकांमुळे इतर १०० चॅनेलवरच्या वाईट मालिकाना टाळता येत नाही.
यावर एक ठराविक छापाचे उत्तर मिळते. रिमोट तुमच्याकडे आहे ना मग तुम्ही पाहू नका त्य मालिका. मग, करतील ते बंद. पण मूळ प्रश्न वेगळाच आहे ना! समजा 95 टक्के मनोरंजन बंद करायच्या लायकीचे असेल, तर मग काय करायचे? आणि बघणार्यांना थोपवणार तरी किती? मुळात, म्हणजे प्रेक्षक हा राजा असताना त्यानेच का बदलायचे? हळूहळू जर तुम्ही त्याची बरे वाईट ठरवायची ताकदच कमी करत असाल तर तो ठरवणार तरी कसा?आजकाल, अनेक पाश्चात्य कार्यक्रमांची जुळी रूपे भारतात येतात, यशस्वी होतात. त्यांचे अनुकरण करा हो,आमची ना नाही, पण आपली संस्कृती, आपली वैशिष्टये जपणार की नाही? बरं, कोणालाच पूर्ण पाश्चात्य व्हायचे नाही!प्रत्येकाला दररोज खायला वरणभातच लागतो ,चार दिवस रोज खालल्यावर त्याला पिझ्झा चा विट यायला लागतो. मग हा तिढा कसा सोडवणार, आणि आमची जी नवी पिढी आहे, तिला त्यापासून कसे वाचविणार? उपाय तर केला पाहिजे. त्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. मी आपल्या परीने करत आहेच. पण त्याचबरोबर अजुन एक गोष्ट केरतोय, देवाजवळ प्रार्थना करतोय, की बाबा रे, या रंजनात पुन्हा एकदा मन येऊ दे रे....
0 comments:
Post a Comment