मागोवा...मराठी रंगभूमीच्या वाटचालीचा



मध्यंतरी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा फोन आला. शिवाजी विद्यापीठाच्या 'शाहू संशोधन केंद्रा'ची धुरा डॉ. विलास संगवींच्या नंतर डॉ. पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. शाहू संशोधन केंद्रानं आता कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहास प्रसिध्द करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. अशा प्रकारचा प्रकल्प पूर्ण करायचा तर त्यासाठी अनेकांचा सहयोग मिळवणं हे ओघानं आलंच. फोन त्याअनुषंगानं होता. कोल्हापुरातील गद्य नाटकं व  रंगभूमी याबद्दलचे काही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध होऊ शकतात का हा डॉ. पवारांनी माझ्यासमोर टाकलेला सवाल होता.
डोक्याला नवं खाद्य मिळालं. पुस्तकं धुंडाळायला सुरुवात झाली. आमदार पी.बी.साळुंखेंच्या संग्रहातलं 1930 सालचं एक पुस्तक हाताला लागलं. बडोद्यातील सेंट्रल लायब्ररीचे ग्रंथपाल आणि लेखक गणेश रंगनाथ दंडवते यांनी लिहिलेल्या या पुस्तकात अनेक गमतीचे आणि आज विस्मरणात गेलेले संदर्भ वाचायला मिळाले. महाराष्ट्रात पूर्वीच्या काळी सार्वजनिक अथवा खाजगी उत्सवप्रसंगी लळिते सादर होत. बहुरुपे, गोंधळ व लळितांमधूनच पुढे मराठी रंगभूमी अवतरली असे मानणारा एक वर्ग आहे. लळितांविषयी दंडवतेंनी आपल्या पुस्तकात म्हटलंय, ''19 व्या शतकाच्या आरंभी मुंबई मुक्कामी दादोपंत नावाच्या एका मराठा गृहस्थाने लळिते करुन दाखवण्यास सुरुवात केली. त्याच्या हाताखाली शिकून सावजी मल्लप्पा, बडोद्याचा वाघोजीबुवा व मुंबईचा पाटीलबुवा असे तिघे इसम तयार झाले. पुढे त्यांच्यात फाटाफूट होऊन सावजी पुण्यास व वाघोजी बडोद्यास निघून गेला. पाटीलबुवा मुंबईतच राहून पुष्कळ वर्षे लळितात आपले नाव गाजवित राहिला. पाटीलबुवाच्या हाताखाली शिकून जी मंडळी तयार झाली त्यात कोळभाटवाडीतील विठोबा रोटकर आगरी याचे लळित व विशेषेंकरून त्यातील मच्छिंद्र आख्यान फारच उत्तम होत असे व ते पाहाण्यास सर्व शहर लोटे.  लळिते ही जरी धार्मिक स्वरुपाची व वेदांतपर असली तरी त्यात अनेक पात्रे रंगभूमीवर आणता येत. छडीदार, भालदार, चोपदार, ब्राह्मण, वासुदेव, दिंडीगण, भाट, परदेशी, जंगम, बैरागी, काशीकापडी, वाघ्यामुरळी, सौरीमुंडा, कैकाडीण, गोंधळी, हरीदास, आराध्ये अशी पंचवीस-तीस सोंगं रंगभूमीवर येऊन आपापली कामं करुन जात.''
महाराष्ट्रातील नाटयकलेची सुरुवात सांगलीतून झाली असाच उल्लेख दंडवतेंनी आपल्या पुस्तकात केला आहे. कर्नाटकातील कानडी नाटके पाहून तशी नाटके मराठीतही व्हावीत अशी कल्पना कै. श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन सांगलीकर यांच्या मनात दीर्घकाळ घोळत होती, आणि त्यांनी विष्णूपंतांना म्हणजे विष्णू अमृत भावे यांना मराठी रंगभूमी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. हे सांगताना दंडवतेंनी म्हटले आहे, ''सन 1842 च्या सुमारास सांगलीस भागवत नावाची एक कानडी नाटकमंडळी आली होती. तिचे प्रयोग सांगलीकरास आनंदवीत असता ते कानडी प्रयोग पाहून यजमान अप्पासाहेब व आश्रित विष्णुदास या उभयतासही एकदम चालना मिळाली व त्याच्या दुसऱ्या वर्षीच भावे यांनी आपले पहिले पौराणिक नाटक 'सीतास्वयंवर' रंगभूमीवर आणिले आणि पुढे तर आपला पौराणिक रत्नाकर मंथून त्यातून फार नाही तरी 40-50 रत्ने बाहेर काढिली.'' दंडवतेंनी विष्णूपंतांच्या अंगी असणाऱ्या विविध कला कौशल्यांवरही प्रकाश टाकलेला आहे.
त्या काळातील नाटयप्रयोगांविषयी जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार मराठी रंगभूमी त्यावेळी अगदी प्राथमिक अवस्थेत होती. सार्वजनिक देवालये, एखाद्या मोठया वाडयाचा चौक किंवा एखादे मोठे पटांगण अशा ठिकाणी नाटयप्रयोग होत. मागे एखादा काळा पडदा लावून पात्रे मेकअप् करुन पडद्यासमोर येत. भाव्यांच्या नाटकपध्दतीचे वर्णन मराठी रंगभूमी नावाच्या पुस्तकात केले आहे ते असे : प्रथम सूत्रधाराने पडद्याबाहेर एकाबाजूस उभे राहून मंगलाचरण करावयाचे. यात ईशस्तवनपर काही पद्ये तालसुरात म्हणावयाची. नंतर वनचराचा वेष घेऊन विदूषकाची स्वारी बाहेर यावयाची. त्याचे वेडेवाकडे नाचणे झाल्यावर सूत्रधाराचा व त्याचा विनोदपर संवाद व्हावयाचा. यात उभयतांची मुलाखत व ओळखदेख होऊन नाटक कोणते करावयाचे हे सूत्रधाराने सांगावयाचे व पात्रांची सिध्दता आणि व्यवस्था ठेविण्याविषयी त्यास बजवावयाचे नंतर गजानन महाराजांचे स्तवन करुन पडदा उघडावयाचा. पडदा उघडल्यावर सूत्रधाराने गजानन महाराजास वंदन करुन नाटकामध्ये विघ्ने येऊन नयेत अशा विषयी त्यांची प्रार्थना करावयाची व गजानन महाराजांनी आशीर्वाद दिलयावर पडदा पडावयाचा. नंतर ब्रह्मकुमारी सरस्वती हिचे स्तवन करुन तिला रंगभूमीचे ठायी पाचारण करावयाचे. तिचे आगमन झाल्यावर पात्रांचे ठायी धीटपणा व वक्तृत्त्वशक्ती असावी असा वर मागून घेऊन तिचे विसर्जन करावयाचे व नंतर नाटकास आरंभ करावयाचा. प्रारंभ करतेवेळी सूत्रधाराने नाटकात कोणता कथाभाग येणार आहे व आरंभीचा पसंग कसा आहे याचे पद्यातून वर्णन करावयाचे व नंतर पात्रांनी रंगभूमीवर भाषण करावयाचे.
सुरुवातीच्या काळी नाटकांची छापील पुस्तके नसल्याने नाटकाचे चालक पौराणिक कथाभागावरुन पात्रांची भाषणे तयार करीत आणि ती संथा दिल्याप्रमाणे पात्रांकडून पाठ करुन घेत. बहुतेक पात्रे अशिक्षित असल्याने त्यांच्याकडून घोकंपट्टी करुन घेतल्याखेरीज इलाज नसे. सांगलीत एकदा नाटकांची सुरुवात झाल्यानंतर अगदी थोडया कालावधीत सांगलीकर, कोल्हापूरकर, इचलकरंजीकर, आळतेकर, उंब्रजकर अशा पाच-सात नाटकमंडळया या परिसरात सुरु झाल्या. मात्र या नाटकमंडळयांविषयी फारसा तपशील उपलब्ध होत नाही. राजाश्रय तुटला आणि 1851 च्या सुमाराला विष्णुदास भावे यांना परगावी जाऊन प्रयोग करणे सुरु करावे लागले. उपलब्ध माहितीनुसार भावे यांनी प्रथम कोल्हापुरात आणि नंतर पुण्यामध्ये आपली नाटकमंडळी नेऊन प्रयोग सादर केले. पुण्यामध्ये झालेला नाटकमंडळीचा हा पहिला प्रयोग हे लक्षात घेतले म्हणजे सांगली-कोल्हापूर परिसरात मराठी रंगभूमीने पाय रोवायला सुरुवात केल्यानंतर जवळपास नऊ वर्षांनी पुणे आणि मराठी नाटकांचा संबंध आला हे स्पष्ट होते. पुणे आणि मुंबईकरांनी नंतर मराठी रंगभूमीसाठी अधिक योगदान दिले असले तरी या सर्वाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांनी केली याचा सार्थ अभिमान आपल्याला असायला हवा.
पौराणिक नाटकांची सद्दी कमी झाली आणि परशुरामपंत गोडबोले, कृष्णशास्त्री राजवाडे, गणेशशास्त्री लेले, शिवरामशास्त्री पाळंदे आदींनी संस्कृत नाटकांवरुन मराठी नाटके लिहायला सुरुवात केली तर महादेवशास्त्री कोल्हटकर, विनायक जनार्दन कीर्तने, नीलकंठ जनार्दन कीर्तने, काशीनाथ गोविंद नातू, सखाराम परशुराम पंडित, लक्ष्मण गोपाळ दीक्षित आदींनी इंग्रजी साहित्यकृतींवर आधारित किंवा स्वतंत्रपणे नाटके लिहायला सुरुवात केली. रंगभूमीवर प्रयोग सादर करण्याच्या दृष्टीने महादेवशास्त्री कोल्हटकरांचे 'ऑथेल्लो' (1857), विनायक जनार्दन कीर्तने लिखित 'थोरले माधवराव' (1861) व 'जयपाळ' (1863), बापूसाहेब भाजेकर लिखित 'मनोरमा' (1871), आनंदराव सखाराम बर्वे लिखित 'हिम्मतबहादुर' व सखाराम परशुराम पंडित लिखित 'शेराला सव्वाशेर' (1867) या नाटकांचे मराठी रंगभूमीने व रसिकांनीही स्वागत केले. कालानुक्रमे महादेवशास्त्री कोल्हटकर यांनी लिहिलेले 'ऑथेल्लो' हे आधी लिहिले गेले असले तरी पहिले स्वतंत्र मराठी नाटक म्हणून विनायक कीर्तने यांनी लिहिलेल्या 'माधवराव पेशवे' या नाटकाला नाटयरसिकांनी विशेष मान द्यायला हवा असे गणेश दंडवते यांना वाटते. कोल्हापुरकरांसाठी अभिमानाची गोष्ट ही की 'माधवराव पेशवे' या नाटकाचे जे प्रयोग त्या काळी झाले ते सर्व इचलकरंजीकर नाटक मंडळींनी सादर केलेले होते.
विष्णुदास भाव्यांच्या काळात निघालेली कोल्हापूरकर नाटक मंडळी, नंतर अनेक पौराणिक नाटके  गाजवणारी शाहू नगरवासी नाटकमंडळी किंवा मराठी रंगभूमीवरचे पहिले स्वतंत्र नाटक  सादर करणारी इचलकरंजीकर नाटक मंडळी या नाटकमंडळींची प्रेरणास्थाने, त्यामधील कलाकार, त्यांनी सादर केलेली नाटके हा सारा इतिहासआपण शोधून नव्या पिढीसमोर अवश्य ठेवायला हवा! शाहूनगरवासी नाटक मंडळीने शेक्सपिअरच्या नाटकावर आधारित व प्रा.वा.बा.केळकर लिखित 'त्राटिका' हा नाटयप्रयोग सादर केल्याच्या आठवणी काही ठिकाणी वाचायला मिळतात. सुमारे 25 वर्षे ही नाटकमंडळी रंगभूमी गाजवत होती. बळवंतराव जोग, गणपतराव जोशी, गोविंदराव सुपेकर अशी शाहूनगरवासी नाटकमंडळीतील काही कलाकारांची नावे आहेत. अन्य कलाकारांविषयी तसेच या नाटकमंडळींविषयी ज्यांच्याकडे काही माहिती असेल त्यांनी ती उपलब्ध करुन दिल्यास कोल्हापूरच्या पंचखंडात्मक इतिहासातील रंगभूमीविषयक माहिती परिपूर्ण होण्यास मदत होऊ शकेल. कोणी अशी माहिती माझ्यापर्यंत पोहोचवेल का?


 उदय कुलकर्णी

0 comments:

Post a Comment