संजयवर प्रेक्षक बेहद्द फिदा


कोल्हापुरातील कलाकार संजय मोहिते बद्दल लिहित आहे सौमित्र पोटे. 


सोकाजी टांगमारेच्या भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि
दुस-याच दिवसापासून संजय मोहिते या हरहुन्नरी अभिनेत्याकडे  अनेकांचं लक्ष गेलं. याच 'सोकाजी'ने संजयला ' लोच्या झाला रे'मधील मुख्य भूमिका मिळवून दिली. आजवरच्या त्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेताना, वेळोवेळी स्वत:ला सिद्ध करत तो इथवर पोहोचल्याचं निश्चित जाणवतं.

कोल्हापूर जिल्ह्यातील आरे हे त्याचं मूळ गाव. संजयच्या घराण्यात असा सांस्कृतिक वारसा फारसा कुणाचा नाही. गावी केवळ सोंगी भजन असायचं. या भजनाचं त्याला वेड. पण थेट त्यात सहभाग असा कधीच नाही. त्याचे मित्र नेहमी अशा भजनांमध्ये भाग घेऊन वाहवा मिळवायचे. हा बुजरा असल्याने याला बाहेर ठेवलं जाई. मग चाललेली तालीम तो खिडकीतून पाहत राही. अशीच तालीम सुरू असताना, त्यातल्या एका पात्राला एक भूमिका साकार करता येईना. दिग्दर्शक सांगून दमला. पण गाडी पुढे जाईना. थोडी विश्रांती घेण्यासाठी दिग्दर्शक बाहेर गेला अन इथेच बाहेरचा संजय आत आला. त्याने आपल्या मित्राला ही भूमिका समजावून सांगायला सुरुवात केली. अन दिग्दर्शक आला. संजयची भूमिकेची समज पाहून, ती भूमिका संजयला करण्याची गळ घातली गेली अन संजयने संधीचं सोनं केलं. संजयचा रंगमंचावरचा प्रवास सुरू झाला तो असा अपघाताने.

पुढे त्याने अनेक सोंगी भजनांमध्ये भाग घेतला. त्यानिमित्ताने अनेक स्त्री पात्रं केली. संजय जसा मोठा होऊ लागला, तसं त्याला नृत्यही खुणावू लागलं. मग त्याने अनेक छोट्या-मोठ्या मंडळांच्या नृत्यस्पर्धांमध्ये भाग घेतला, बक्षिसं मिळवली. सोंगी भजनांपासून सुरू झालेला प्रवास छोट्या छोट्या नाटुकल्यांपर्यंत आला होता. केवळ हौस म्हणून सुरू केलेल्या या अभिनयातचं करिअर करण्याची इच्छा जोर धरू लागली. त्या वेळी त्याने कोल्हापूरचा रस्ता धरला. काळम्मावाडीच्या हनुमान नाट्य कला केंदातून त्याने नाटकं करायला सुरुवात केली. त्या वेळी 'जोडीदार', 'निष्पाप', 'विच्छा माझी पुरी करा' अशी अनेक नाटकं त्याने केली. दरम्यान, दिग्दर्शनाच्याही सगळया बाजूंचा त्याने अभ्यास केला. 'विच्छा..'मधील हवालदार त्याने भलताच गाजवला. त्याच वेळी द.मा. मिरासदार यांचं 'सोकाजी टांगमारे' त्याच्या हातात पडल्याचं तो सांगतो. 'नाटक सुंदर होतंच, पण नाटकातील एक पात्र बदलून तृतीयपंथी केलं तर नाटक जोर धरेल आणि ते भलत्याच उंचीवर जाऊन मनोरंजन करेल,' असं त्याला वाटलं. संजयने दमांना विनंती केली. खूप विचार केल्यानंतर त्याला परवानगी मिळाली आणि 'सोकाजी' साकारलं. या नाटकाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं. 'हे नाटक ज्यांनी पाहिलं त्यांनी मला मुंबईचा रस्ता धर असं सांगितलं' असंही तो सांगतो. पण मुंबईला हात हालवत येणं संजयला परवडणारं नव्हतं. कारण मागे संपूर्ण कुटुंब होतं. मग त्याने 'सोकाजी'चा प्रयोग मुंबईमध्ये आणायचं ठरवलं. मुंबईत सोकाजीचे प्रयोग लागले. प्रयोगांची दखल मुंबईतील प्रेक्षकांनी घेतली. त्याच वेळी हे नाटक भरत जाधव यांनीही पाहिलं. त्यांनीही संजयला दाद दिली. याबद्दल बोलताना संजय सांगतो, 'सोकाजीचा प्रयोग पाहायला भरतदादा आले. थोडावेळ थांबतील असं समजलं होतं. पण त्यांनी पूर्ण नाटक पाहिलं आणि आवर्जून मला भेटले. त्यानंतर मात्र आत्मविश्वास दुणावला. 'मटा'सन्मानचं मानांकनही मिळालं आणि भूमिकेची दाखल घेतली गेल्याचा दाखला मिळाला. पुरस्कार मिळेलच याची शाश्वती नव्हती. कारण शर्यतीमध्ये मोठे आणि अनुभवी लोक होते. पण पुरस्कार गवसला. तो क्षण खूप मोलाचा होता. त्यानिमित्ताने मुंबईमध्ये माझी नोंद झाली.'

' श्री चिंतामणी'मार्फत 'लोच्या..'मध्ये शिरकाव होण्याचा किस्साही मजेदार आहे. तो सांगताना संजय म्हणतो, 'अरे, एक दिवस मला थेट केदारसरांचाच फोन आला. त्यांनी माझं नाटक पाहिलेलं नाही. पण त्यांना कुणीतरी माझं नाव रेकमेण्ड केलं. लताबाई आणि केदारसरांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पहिलं वाचन झाल्यावर नाटक जमेलसं वाटलं.

मुंबईतील नाटकाचा अनुभव खूप वेगळा असल्याचं मात्र तो आवर्जून सांगतो. 'मुळात हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर होतं. तिथेच ते बंद झालं. त्यामुळे पुन्हा नव्याने करताना, थोडं प्रेशर होतं, आजही आहेच. शिवाय कोल्हापूर आणि मुंबईच्या प्रेक्षकांमध्ये खूप फरक आहे. तिकडे लाऊड रिअॅक्शन्स लागतात. इथे मात्र कॉमेडीचा सेन्स आहे. लोक प्रेडिक्ट करतात. इथे लोकांना नाटक विनोदी असलं तरी ते जेन्युईन असावं असं वाटेल असं करणं हेच खरं आव्हान आहे.

' लोच्या...'ची प्रॅक्टिस सुरू असताना नाटक केदार शिंदेच्या मनाप्रमाणे वेग घेत नव्हतं. 'केदारसर मला बोलावून म्हणाले, की नाटक जर माझ्या मनासारखं नाही झालं, तर आपण हे बंद करू. हे नाटक लोकप्रिय झालेलं आहेच त्यामुळे इथे स्क्रिप्टचं काम संपतं. पण हे नाटक पुन्हा करून जर ते पडलं तर त्याचा फटका तुला बसेल. नाटकाला नाही. पण इथे आल्या आल्या तू अयशस्वी होणं मला मान्य नाही. बघ काय करू या?' त्या दिवसानंतर मी झपाटल्यागत तालीम करायला लागलो'. आणि खरोखरंच पुढच्या तीन दिवसांतली त्याची प्रगती थक्क करणारी होती. त्यानंतर हे नाटक 'जम के' करण्याचा निर्णय झाला. इतर सर्वच पात्रांनी त्याला साथ दिली.

आता हे नाटक पूर्णत: 'उभं' आहे. त्याचे प्रयोगही सुरू झालेत. संजयची मेहनत रंग आणेल की नाही ते येत्या काही दिवसांत समजेल. पण हे नाटक यशस्वी करण्यासाठी 'कलापुरातून' आलेल्या या मुलाने आपलं सर्वस्व पणाला लावलंय हे नक्की!

- सौमित्र पोटे

0 comments:

Post a Comment